वृत्तसंस्था / मुंबई
भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार तसेच आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघातील स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने क्रिकेटच्या टी-20 या अतिजलद प्रकारात 8 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. या प्रकारात अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज आहे.
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स बरोबरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळविला. या आयपीएल हंगामातील मुंबईचा हा पहिलाच विजय आहे. कोलकाता नाईट रायडर्स हा या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. कोलकाता संघाविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 9 चेंडूत दोन उत्तुंग षटकार आणि 3 चौकारांसह जलद 27 धावा झोडपल्या. या कामगिरीमुळे त्याने टी-20 प्रकारात 8 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. भारतातर्फे विराट कोहलीने टी-20 प्रकारात सर्वाधिक म्हणजे 12976 धावा जमविल्या असून मुंबईचा रोहीत शर्मा 11851 धावांसह दुसऱ्या स्थानावर तसेच माजी सलामीचा फलंदाज शिखर धवन 9797 धावांसह तिसऱ्या आणि सुरेश रैना 8654 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. आता या यादीमध्ये सूर्यकुमार यादव पाचव्या स्थानावर आहे.









