वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताची आंतरराष्ट्रीय महिला हॉकीपटू वंदना कटारियाने मंगळवारी येथे आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. आपल्या 15 वर्षांच्या हॉकी कारकिर्दीमध्ये तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी केली.
भारतीय महिला हॉकी संघातील 32 वर्षीय वंदना कटारिया ही आघाडी फळीतील प्रमुख म्हणून ओळखली जात असे. तिने 320 आंतरराष्ट्रीय सामन्यात 158 गोल केले आहेत. भारतीय महिला हॉकीच्या इतिहासामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी वंदना ही पहिली भारतीय हॉकीपटू आहे. हॉकी क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेताना माझ्यावर कोणतेही वैयक्तिक दडपण आले नाही. कारण निवृत्तीचा निर्णय मी योग्यवेळीच घेतल्याचे वंदनाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. भारतीय हॉकी शौकिकांनी तसेच हॉकीक्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या खेळाचे केलेल्या कौतुकाबद्दल वंदनाने त्यांचे आभार मानले आहेत.
2009 साली वंदनाने भारताच्या वरिष्ठ महिला संघामध्ये पदार्पण केले. त्यानंतर मात्र तब्बल 15 वर्षे तिने भारतीय संघातील आपले स्थान कायम राखले होते. 2020 साली झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत चौथे स्थान मिळविणाऱ्या भारतीय महिला संघामध्ये वंदनाचा समावेश होता. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत हॅट्ट्रीक नोंदविणारी वंदना कटारिया ही भारताची एकमेव महिला हॉकीपटू म्हणून ओळखली जाते. प्रशिक्षकवर्गाने आपल्याला दिलेल्या सहकार्याबद्दल आपण हॉकी क्षेत्रात चांगली कामगिरी करु शकले, असेही वंदनाने म्हटले आहे. वंदना कटारिया ही हरिद्वारच्या रोशनबाद येथील रहिवासी आहे. तिने आपल्या हॉकी क्षेत्रातील शेवटचा सामना गेल्या फेब्रुवारी महिन्यात भुवनेश्वर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत खेळला होता. दिवंगत वडील आणि आईच्या मार्गदर्शनामुळेच मी हॉकी क्षेत्रात चांगली कामगिरी करु शकले तसेच माझ्या आई-वडीलांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या हॉकीचा पाया रचू शकले. हॉकीच्या व्यासपीठावर सातत्याने कठोर परिश्रम तसेच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध कडवी लढत देण्याचे धैर्य माझ्यात निर्माण झाल्याने मी माझ्या संघाला विजय मिळवून देवू शकले, असेही वंदनाने आपले मनोगत व्यक्त केले आहे. हॉकी क्षेत्रातून निवृत्त झाले असले तरी या क्षेत्राशी संबंध माझा यापुढेही राहील तसेच हॉकी इंडिया लीगला नेहमीच माझ्याकडून प्रोत्साहन मिळेल, असे वंदनाने म्हटले आहे.









