विक्री करात 2.73 टक्के वाढ : कर 18.44 टक्क्यांवरून 21.17 टक्क्यांवर : जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवरही परिणाम
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात 1 एप्रिलपासून दूध, वीज दरवाढ आणि इतर सेवांसाठी शुल्कवाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे खिशावर अधिक ताण पडत असतानाच मंगळवारी मध्यरात्रीपासूनच डिझेलवरील करात 2.73 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 18.44 टक्के असणारा डिझेलवरील विक्री कर 21.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी डिझेलसाठी प्रति लिटर 2 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच राज्य सरकारने दूध दर प्रति लिटर 4 रुपये आणि वीजदर प्रति युनिट 36 पैसे वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांना धक्का बसला आहे. दरवाढीमुळे भाजपने बुधवारपासून राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली असतानाच मंगळवारी रात्री राज्य सरकारने डिझेलच्या विक्री करात 2.73 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्रीपासूनच याची अंमलबजावणी होणार असून ग्राहकांना प्रति लिटरसाठी 2 रुपये जादा मोजावे लागणार आहेत. करवाढीपूर्वी बेंगळूरमध्ये 89.02 रुपये असणारा डिझेलचा दर 91.02 रुपयांवर पोहोचला आहे.
4 नोव्हेंबर 2021 रोजी राज्यात डिझेलवरील विक्री कर 24 टक्के होता. त्यामुळे तेव्हा डिझेलचा दर प्रलि लिटर 92.03 रुपये होता. नंतर राज्य सरकारने 15 जून 2024 रोजी हा कर 18.44 टक्क्यांवर आणला होता. आता सक्षम प्राधिकरणाच्या संमतीनंतर 1 एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून डिझेलवरील कर 21.17 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्याचे सरकारने सांगितले आहे. परिणामी 2 रुपये दरवाढ होणार आहे. परंतु, इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात डिझेलचा दर कमी असल्याचे सरकारने म्हटले आहे.
मालवाहतूक होणारे ट्रक, कॅन्टर व इतर वाहनांसाठी डिझेलचा वापर होतो. दरात 2 रुपयांनी वाढ झाल्यामुळे आगामी दिवसांत याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या दरावरही होण्याची शक्यता आहे. भाजी, फळांच्या किमतीवरही डिझेल दरवाढीचा परिणाम होणार आहे.
डिझेलचा दर (कर्नाटकातील करवाढीनंतर)
शहर राज्य दर
बेंगळूर (कर्नाटक) 91.02 रु.
होसुरु (तामिळनाडू) 94.42 रु.
कासरगोड (केरळ) 95.66 रु.
अनंतपूर (आंध्रप्रदेश) 97.35 रु.
हैदराबाद (तेलंगणा) 95.70 रु.
कागल (महाराष्ट्र) 91.07 रु.
अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी केलेले भाकित खरे ठरले!
अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मी केलेले भाकित तंतोतंत खरे ठरले आहे. अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ घोषित न करता आता राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. सिद्धरामय्या सरकार दिवसागणिक दरवाढ करून गरीब, मध्यमवर्गीयांचे रक्त शोषून घेत आहे.
– आर. अशोक, विधानसभा विरोधी पक्षनेते









