मृतांमध्ये चार मुलांचा समावेश : दक्षिण 24 परगणा येथे दुर्घटना
वृत्तसंस्था/ पाथर प्रतिमा
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्dयातील पाथर प्रतिमा येथे सोमवारी रात्री उशिरा भीषण दुर्घटना घडली आहे. येथील एका घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आणि यामुळे 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये चार मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे.
संबंधित घरापासून काही मीटरच्या अंतरावर एक अधिकृत फटाके निर्मिती कारखाना होता. ज्या घरात विस्फोट झाला, बहुधा त्या घरात फटाके निर्मितीसाठीची सामग्री ठेवण्यात आली होती असा दावा पाथर प्रतिमाचे तृणमूल आमदार समीर कुमार जना यांनी केला आहे. तर पोलीस अधीक्षकांनी आमदाराचा हा दावा नाकारला आहे. संबंधित घरात फटाक्यांसाठीचा कच्चा माल नव्हता असे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे. तर फॉरेन्सिक तपासणीनंतरच स्थिती स्पष्ट होईल असेही त्यांनी नमूद केले आहे.
ज्या इमारतीत ही घटना घडली तेथे क्रूड बॉम्ब तयार केले जात होते. गंभीर कारवाई करण्यात येण्यापूर्वी अशाप्रकारच्या आणखी किती घटना घडणार? पश्चिम बंगाल राज्य देशी बॉम्बच्या ढिगावर का बसला आहे याचे उत्तर पोलीस महासंचालकांनी द्यावे. पश्चिम बंगालमध्ये अशाप्रकारच्या घटनांसाठी काहीच उत्तरदायित्व नाही. अक्षम गृहमंत्री ममता बॅनर्जी यांना अशाप्रकारच्या घटनेसाठी दोषी ठरविले जावे असे भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांनी म्हटले आहे.









