पासपोर्ट परत करण्यास दिला नकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने युट्युबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाला झटका देत पासपोर्ट जारी करण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने रणवीरला दोन आठवड्यांनी याप्रकरणी दाद मागण्यास सांगितले आहे. पासपोर्ट जरी करण्याचा आदेश दिल्यास तपास प्रभावित होऊ शकतो असे न्यायाधीश सूर्यकांत आणि एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. याचिकाकर्त्याची उपजीविका प्रसिद्ध व्यक्तींची मुलाखत घेतल्याने चालते, याचमुळे त्याला सातत्याने प्रवास करावा लागतो, यामुळे जप्त पासपोर्ट परत केला जावा असा युक्तिवाद रणवीरच्या वकिलाने केला होता.
पासपोर्ट जमा करण्याच्या अटीत सुधारणा करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली होती. याप्रकरणी दोन पैलू आहेत, जर आम्ही प्रवास करण्याची अनुमती दिली, तर तपासावर प्रभाव पडेल आणि तो स्थगित देखील केला जाऊ शकतो असे खंडपीठाने म्हटले आहे. तर तपास पूर्ण होण्यास अजून 2 आठवडे लागणार असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खंडपीठाला सांगितले. यानंतर खंडपीठाने अलाहाबादियाला दोन आठवड्यांनी विनंती करण्यास सांगितले आहे. न्यायालयाने अन्य युट्युबर आशीष चंचलानीचा पासपोर्टही जारी करण्यास नकार दिला. हे सर्वजण स्टँडअप कॉमेडी शो इंडियाज गॉट लेटेंटमध्ये अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी आरोपी आहेत.









