कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात रेडिरेकनर दरात 5.1 टक्के इतकी वाढ झाली आहे. दोन वर्षाने ही वाढ होत आहे. यामुळे जमिनीचे दरात वाढ होणार असल्याने घर खरेदीही महागणार आहे.
राज्य शासनाकडून गेले दोन वर्ष रेडिरेकनरचे दर जैसे थे ठेवले होते. यामुळे बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. याचवेळी क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांकडूनही रेडिरेकनरचे दर दरवर्षी वाढ करू नये. तीन वर्षानेच तेही गरज असल्यास वाढ करावे, अशी मागणी केली होती. यंदाच्या वर्षी रेडिरेकनरचे दर 10 ते 15 टक्के वाढ होईल, असे तज्ञांचे मत होते. बांधकाम व्यावसायिकांनीही याची धास्ती घेतली होती. रेडिरेकनरचे दर दरवर्षी 31 मार्च रोजी निश्चित केले जातात. सोमवारी राज्य शासनाच्या नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी रेडिरेकरनचे दर निश्चित केले आहेत. यासंदर्भातील आदेश त्यांनी काढले असून कोल्हापूर महापालिका क्षेत्रासाठी 5.1 टक्के रेडिरकनर दरात वाढ केली आहे.
विविध शासकीय योजना व विकास कामांचा वाढता बोजा लक्षात घेता सध्या सरकारला आर्थिक उत्पन्न वाढीवर भर द्यावा लागणार आहे. राज्य शासन आपले महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी रेडिरेकनर दरात वाढ जाहीर केली आहे. कोल्हापूरचे 5.1 टक्के वाढ केली आहे. याची अंमलबजावणी आज, 1 एप्रिलपासून केली जाईल. मात्र, यामुळे दस्तनोंदणी आणि घराच्या किंमतीत वाढ होईल. त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर होण्याची शक्यता आहे.
- 2025-26 प्रस्तावित सरासरी वाढ
ग्रामिण क्षेत्र-3.36 टक्के
प्रभाव क्षेत्र-3.29 टक्के
महापालिका क्षेत्र-5.95 टक्के
संपूर्ण राज्याची एकूण वाढ -3.89 टक्के
- महापालिका क्षेत्रातील 2025-26 मधील वाढ
ठाणे-7.72
मिरा भाईंदर -6.26
नवी मुंबई-6.75
उल्हासनगर-9
भिवडी–निजामपूर 2.50
वसई–विरार 4.50
पनवेल -4.50
पुणे -4.16
पिंपरी–चिंचवड-6.69
सांगली-5.70
कोल्हापूर-5.01
इचलकरंजी-4.46
सोलापूर-10.17








