युवा समिती सीमाभागकडून आमदार शिवाजी पाटलांची भेट
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्यावतीने चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांची भेट घेण्यात आली. युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना प्रशासनाने हद्दपारीची नोटीस बजावली आहे. या दडपशाहीविरोधात महाराष्ट्र सरकारने आवाज उठवावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करावी, अशी विनंती आमदारांकडे करण्यात आली. बाळेकुंद्री येथील बसवाहकाच्या खोट्या आरोपापासून ते किणये येथे मराठी भाषेच्या विरोधात पीडीओने केलेली अरेरावी याची माहिती आमदार पाटील यांना करून देण्यात आली. मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या युवकाचा सत्कार केल्याप्रकरणी शुभम शेळके यांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली. गेल्या महिन्याभरात कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे घातल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन दिले. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, सरचिटणीस मनोहर हुंदरे, प्रवीण रेडेकर, नारायण मुचंडीकर, विजय जाधव, चंद्रकांत पाटील, रामनाथ मुचंडीकर, सुयोग कडेमनी यासह इतर उपस्थित होते.









