केल्हापूर / सुधाकर काशीद :
फुटबॉल खेळात इर्षा जरूर पाहिजे. कारण त्याशिवाय खेळ रंगतच नाही. पण इर्षेला खुन्नस जोडली गेली की खेळाचा कसा विचका होतो, हे कोल्हापुरात वारंवार होणाऱ्या स्थानिक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने कोल्हापूरकरांना पहायला मिळते आहे. फुटबॉलची पंढरी समजली जाणाऱ्या शाहू स्टेडियमला यामुळे फुटबॉल ऐवजी रणांगणाचे स्वरूप आले आहे. काहीतरी ‘कचकच’ झाल्याशिवाय स्पर्धा पूर्ण होतच नाही, अशी परिस्थिती आली आहे. विजयापेक्षा त्यांची आपण जिरवली कशी, ही भावना या वातावरणामुळे अधिक गडद होत आहे. त्याचा कोणाला तरी फार मोठा फटका बसणार आहे, याचेच संकेत या साऱ्या वातावरणातून दिसत आहेत.
कोल्हापूर आणि फुटबॉल यांचे नाते खूप वेगळे आहे एकेका घरात आजोबा, वडील आणि मुलगा अशा तीन पिढ्यांनी फुटबॉल जपला आहे. बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी पाचवी पूजन हा विधी असतो. बाळाच्या भविष्याचा वेध घेण्याचा हा एक धार्मिक विधी आहे. या विधीच्या पूजेत फुटबॉल आणि गल्लीतील, पेठेतील फुटबॉल संघाची जर्सी श्रद्धेने पुजण्यावर अनेक कुटुंबात भर आहे. आपल्या घरातील याही मुलाने फुटबॉल मैदान गाजवावे, अशीच त्यामागची एक निखळ भावना आहे आणि घडतेही तसेच आहे. मुल पाच–सहा वर्षाचे झाले की त्याच्या पायात फुटबॉल ठरलेलाच आहे. अमुक रंगाची जर्सी म्हणजे आपल्या तालमीची, आपल्या पेठेची हे मुलांना आपोआपच कळायला लागते, ही सत्य परिस्थिती आहे. हे सांगायचे कारण की, लहान वयातच फुटबॉलची आवड त्यांना लागते, हे ठरलेले आहे.
कोल्हापुरातला फुटबॉल तालमी आणि पेठांनी अतिशय नियोजनबद्ध जपला आहे. कोल्हापूर राजघराण्यात तर फुटबॉलची पॅलेस टीम इतिहास गाजवून गेली आहे. विशेषत: शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शाहूपुरी, फुलेवाडी, उत्तरेश्वर पेठ येथे फुटबॉल संघ आहेत. शाहूपुरी फुटबॉल संघात तर बाप आणि मुलगा एकत्र खेळण्याचा इतिहास आहे. याशिवाय फुटबॉल खेळातून तयार झालेले अनेक जण नगरपालिका महापालिका, एसटी, शिवाजी विद्यापीठ, आरसीएफ सहकारी बँका, पोलीस, केएमटी, मेनन अँड मेनन यासारख्या ठिकाणी नोकरीवर चमकले आहेत. आणि हे अगदी खरे की पायात घालण्यासाठी चांगले बूट नसल्यामुळे अनवानी पायाने फुटबॉल खेळलेले अनेक खेळाडू आहेत. उमेश चोरगेसारख्या खेळाडूला तर सिनेमात हिरो म्हणून संधी मिळाली आहे.
फुटबॉलच्या वाढत्या प्रसारात खेळाची इर्षा जरूर वाढली. पण त्या जोडीला पेठा–पेठा तालमी–तालमीतली इर्षा वाढत गेली आहे. इर्षा जरूर वाढू दे, पण त्याला खुन्नसची जोड आली आहे आणि आजची मॅच आपण जिंकायची, याऐवजी आज आपण त्यांची जिरवायची, उद्या त्यांची जिरवायची, असली भावना वाढत गेली आहे. या पेठेतला एक आणि त्या पेठेतला एक संघ यांच्यात फायनल मॅच आहे, म्हटलं की प्रशासन, पोलीस बंदोबस्ताची तयारी अगोदरच करायला सुरुवात होते. कितीही बंदोबस्त असू दे. राडा करायचाच, अशी तयारी समर्थकांकडून सुरू झालेली असते. सामना बघायला यांनी त्या गॅलरीत आणि त्यांनी या गॅलरीत बसायचे, अशी समर्थकांची विभागणी ठरून गेली आहे आणि सामना सुरू असताना एकमेकाला मुद्दाम डिवचणारी एक यंत्रणा कार्यरत आहे. सामन्यात एखादा वादग्रस्त क्षण झाला, की शाहू स्टेडियमवर राडाच राडा, ही प्रथाच पडून गेली आहे.
काल झालेल्या शिवाजी विरुद्ध पीटीएम यांच्यातील सामन्याने तर केवळ खुन्नसच अनुभवली. मैदानावर फ्री–स्टाईल कुस्ती खेळाडूंनी केली. खेळाडू तर आपली तालीम, आपली पेठ या पलीकडे फुटबॉलचे आणखी काही विश्व आहे, हे मानतच नाहीत. आपल्या ‘त्या’ प्रतिस्पर्ध्याला आपण हरवले म्हणजे आपण जग जिंकले, अशी त्यांची समजूत आहे. ते गल्लीत खूप चांगले खेळतात. पण राज्य, राष्ट्रीय पातळीवर आपण खेळले पाहिजे, याचा विचारच ते करत नाहीत. त्यामुळे कोल्हापुरातले फार कमी खेळाडू राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. तालीम पेठ आणि कोल्हापूरच्या प्रेमामुळे चांगल्या नोकऱ्या सोडून काही जण पुन्हा परत आले आहेत. परवा तर आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धा मध्येच सोडून खेळाडू परत आले आहेत. त्यांच्यावर काहीही कारवाई झालेली नाही, अशी परिस्थिती आहे.
कोल्हापूरचे खेळाडू चिवट आहेत. घरातले साधे जेवण घेऊन त्यांचा मैदानावरचा स्टॅमिना खूप चांगला आहे. सरावात सातत्य आहे. पण ‘कोल्हापूर’मध्येच खेळायचे, त्या आपल्या प्रतिस्पर्धी संघालाच वारंवार हरवायचे, विजय मिरवणुकीत अंग भिजून घामाने थबथबले जाईल, एवढे नाचायचे, एवढेच त्यांचे ध्येय आहे की काय, असे वाटण्यासारखी ही परिस्थिती आहे. कोल्हापूरच्या बाहेर फुटबॉलचे खूप मोठे जग आहे. लाखाच्या पटीत मानधन देणारे संघ आहेत, हे इथल्या ठराविक संघांना कोणीतरी समजून सांगण्याची गरज आहे. कारण आता शाहू स्टेडियमवरचा तोच तोच राडा पाहून कोल्हापूरकर तर खरंच वैतागले आहेत.
- छुप्या समर्थकांना असोसिएशनच्या अध्यक्षांनी समजावण्याची गरज
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन त्यांच्या परीने या साऱ्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात असोसिएशनच्याही काही मर्यादा आहेत. असोसिएशनमध्येही इकडचे, तिकडचे छुपे समर्थक आहेत. त्यामुळे नियंत्रण शंभर टक्के कोणीच कोणाचे मानत नाही. त्यामुळे असोसिएशनमधल्या काही छुप्या समर्थकांना मालोजीराजे यांनी समजावण्याची गरज आहे आणि ‘आपण म्हणजेच कोल्हापूरचा फुटबॉल’ या भ्रमात असलेल्या काही फुटबॉल संघांनाही असेच समजावण्याची आवश्यकता आहे.








