महापालिकेची कारवाई : स्थानिकांचा विरोध : पोलिसांची मध्यस्थी
बेळगाव : देवांगनगर वडगाव क्रॉस येथील मिरचीकांडप यंत्र बंद करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शुभा. बी. यांनी बजावला आहे. त्यानुसार महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी व त्यांचे सहकारी सदर मिरचीकांडप यंत्र शनिवारी बंद करण्यासाठी गेले होते. मात्र, सदर घर बंद असल्याने दरवाजावर नोटीस चिकटविण्यात आली. पण, या कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने शहापूर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. देवांगनगर वडगाव क्रॉस येथे गेल्या अनेक वर्षापासून मिरचीकांडप यंत्र सुरू आहे. मात्र, यामुळे रहिवाशांना त्रास होत असल्याबाबत काहीनी याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच महानगरपालिकेकडे तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारीची दखल घेत महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी सदर मिरचीकांडप यंत्र बंद करण्याचा आदेश बजावला आहे. आदेशानुसार मिरचीकांडप यंत्र बंद करण्यासाठी शनिवारी महापालिका अधिकारी गेले होते. मात्र, सदर घर बंद असल्याने दरवाजावर नोटीस चिकटवण्यात आली. ही माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईला विरोध केला. त्यामुळे शहापूर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.









