वार्ताहर/किणये
कावळेवाडी येथे रस्त्याच्या डांबरीकरण कामाला नुकतीच सुरुवात केली आहे. कावळेवाडी ते बेळवट्टी मुख्य रस्त्यापर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून या गावाच्या रस्त्यांसाठी तसेच विविध विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती ग्रामपंचायत उपाध्यक्ष अॅड. नामदेव मोरे यांनी दिली आहे. कावळेवाडी ते बेळवटटी मुख्य रस्त्यापर्यंत एक किलो मीटर अंतरावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. गावातील पक्क्या आरसीसी गटारी, त्यावरील झाकण, काँक्रीटचे रस्ते व सध्या सुरू असलेले रस्त्याचे डांबरीकरण आदी कामे या निधीतून करण्यात येणार आहेत. डांबरीकरणाचे पूजन ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नाईक व उपाध्यक्ष नामदेव मोरे यांनी केले. यावेळी ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष ज्योतिबा मोरे, रघुनाथ मोरे, यशवंत मोरे, केदारी कणबरकर, कल्लाप्पा येळ्ळूरकर, दीपक सुतार, लक्ष्मण जाधव आदींसह गावकरी उपस्थित होते.









