वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरील शंकरपेटनजीकच्या मलप्रभा नदीवरील पुलाची दुर्दशा झाली असून, हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पुलाची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. सुमारे 50 ते 60 वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम केले होते. मात्र गेल्या चार पाच वर्षांपूर्वी नदीला आलेला महापूर व वाढत्या अवजड वाहतुकीमुळे हा पूल सध्या कमकुवत बनला आहे. पावसाळ्dयात हा पूल बरेच दिवस पाण्याखाली जात असल्यामुळे, पाण्यातून वाहून येणारे लाकडी ओंडके, बांबूची बेटे तसेच झाडेझुडपे, आदी पुलाला येऊन आदळत असल्यामुळे पूल अनेक ठिकाणी खचला आहे. पुलाचे संरक्षक कठडे देखील तुटून गेले आहेत. आजूबाजूचा भरावही पूर्णपणे खचल्यामुळे यापुढे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पुलावरील रस्त्याचीही पार दुर्दशा झाली आहे.
पुलाच्या स्लॅबला एक-दोन ठिकाणी भगदाड पडले आहे. पुलावर नावालाच डांबर शिल्लक आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी सोडण्यात आलेल्या मुशी पूर्णपणे बुजल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी पुलावर गुडघाभर पाणी साचते. पाण्यातून वाहने चालविताना नागरिक व वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच पुलाचे संरक्षक कठडे अनेक ठिकाणी निकामी झाल्यामुळे पुलावर रात्रीच्या वेळी अपघातांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तीन-चार वर्षांपूर्वी या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पुराच्या पाण्यामुळे केवळ एक वर्षातच या पुलाची पुन्हा वाताहात झाली आहे.
पुलाची उंची वाढवण्याची गरज
पुलाचे बांधकाम सुमारे 50 वर्षापूर्वी केले होते. त्यावेळी जांबोटी-खानापूर रस्त्यावरील वाहतूक जेमतेमच सुरू होती. त्यामुळे पुलाला धोका कमी होता. मात्र जांबोटी-खानापूर रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे तसेच हा रस्ता चोर्ला महामार्गाला जोडण्यात आल्यामुळे या रस्त्यावरील आंतरराज्य वाहतुकीत वाढ झाली आहे. पावसाळ्यात किमान 8-10 दिवस पूल पाण्याखाली जात असल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प होते. त्यामुळे सदर पुलाची उंची वाढविण्याची मागणी जनतेतून होत आहे. तरी आमदार विठ्ठल हलगेकर व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष घालून शंकरपेट नजीकच्या पुलाची उंची वाढवावी व दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी होत आहे.









