वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसचे नेते आणि केरळचे खासदार शशी थरुर यांना काँग्रेसच्या श्रेष्ठींनी अप्रत्यक्ष समज दिल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शशी थरुर यांनी काँग्रेसच्या धोरणांविरुद्ध अनेक विधाने केली आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढवून घेतली आहे. थरुर भारतीय जनता पक्षात समाविष्ट होतील, अशी अनुमाने गेल्या 10 दिवसांमध्ये अनेकदा काढली गेली आहेत. मात्र, थरुर यांनी स्वत: आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट करत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या शक्यतेवर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही त्यांच्यासंबंधी संशय कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार टीका करत असताना, थरुर यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्याची एकही संधी सोडलेली नाही. केरळमध्ये 2026 च्या मे महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. ही निवडणूक दृष्टीसमोर ठेवून काँग्रेस श्रेष्ठी थरुर यांना सहन करीत आहेत. कारण केरळमध्ये काँग्रेस आघाडीला विजय मिळवायचा असेल तर थरुर यांचे सहकार्य आवश्यक आहे. मात्र, थरुर यांनी त्यांच्या जीभेला आवर घालावा अशी अप्रत्यक्ष समज त्यांना देण्यात आल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी पत्रकारांना दिल्याने वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.









