वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यापूर्वी अटकेचे कारण स्पष्ट करणे आवश्यक आहे, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच केवळ अटकेचा मेमो देणे आणि अटक करणे हे पुरेसे नसून केवळ मेमोच्या आधारे अटक करणे कायदेसंमत नाही, असेही या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
हे प्रकरण हरियाणातले असून एका व्यक्तीला पोलिसांनी विविध गुन्हे नोंदवून अटक केली होती. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. आरोपीने या कोठडीला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान दिले. तथापी, उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. राजेश ब्ंिांदल यांच्या खंडपीठासमोर आरोपीच्या याचिकेची सुनावणी करण्यात आली. कोणालाही अटक करायची असेल तर अटकेची कारणे नेमकेपणाने स्पष्ट करणे कायद्याच्या दृष्टीने अनिवार्य आहे. केवळ मोघम स्वरुपात कारणे दाखवून किंवा मेमोच्या आधारे अटक बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा या महत्वपूर्ण निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने दिला.









