आपल्याला ज्ञात असलेल्या पदार्थांपैकी लोखंड हा धातू सर्वात बळकट असतो, अशी आपली समजूत आहे. त्यामुळे बांधकाम, फर्निचर, कपाटे इत्यादींमध्ये लोखंडाचा उपयोग केला जातो. तथापि, लोखंडाला ‘गंजण्या’चा शाप असतो. गंजल्यामुळे त्याची शक्ती कमी होते आणि लोखंडी वस्तूही मोडकळीस येतात, हा अनुभव जवळपास प्रत्येकाला येतो. तथापी, झारखंड या राज्यात एक असे झाड आहे, की ज्याचे लाकूड लोखंडापेक्षाही भक्कम आणि टिकावू आहे.
तसे पाहिल्यास लोखंड आणि लाकूड यांच्या भक्कमपणाची तुलना होऊ शकत नाही. लोखंड हे लाकडाला या संदर्भात भारी ठरते. म्हणूनच लाकूड कापण्यासाठी लोखंडाचे पट्टे उपयोगात आणले जातात. लाकूड फोडण्यासाठी लोखंडाची कुऱ्हाड बनविली जाते. तथापि, टिकावूपणाच्या संदर्भात झारखंडमध्ये मिळणारे हे लाकूड अधिक सरस आहे. याचे फर्निचर किंवा अन्य वस्तू कमीत कमी 150 वर्षे टिकून राहतात. त्यांची योग्य प्रकारे निगा राखल्यास त्या 200 हून अधिक वर्षे जशाच्या तशा टिकतात. या झाडाला ‘ब्लॅकवूड’ असे संबोधले जाते. त्याचा वृक्ष ब्लॅकवूड ट्री म्हणून ओळखला जातो. हे लाकूड सर्वात टणक मानले जाते.
या लाकडाला वाळवी लागत नाही. त्याच्यावर पाण्याचा परिणाम होत नाही. त्याची फारशी झीज होत नाही. ते लवकर जळतही नाही. कोरड्या, उष्ण, थंड, ओलसर अशा कोणत्याही वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. आपल्याकडे मिळणाऱ्या सागवान वृक्षाच्या लाकडाचीही हीच वैशिष्ट्यो आहेत. तथापि, ब्लॅकवूड हे लाकूड सागवानापेक्षाही टणक आणि टिकावू असल्याचे दिसून येते. झारखंडमध्ये हा वृक्ष सर्वत्र दिसून येतो. तथापि, त्याच्या व्यापारी लागवडीसाठी आजवर फारच कमी प्रयत्न झाले आहेत. आता ते करण्यात येत आहेत.









