25 लाख रुपयांचे होते बक्षीस : शस्त्रसाठाही जप्त
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना सलग तिसऱ्या दिवशी मोठे यश मिळाले आहे. येथील दंतेवाडा जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 25 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका महिला नक्षलवादीचा खात्मा करण्यात आला. या महिलेकडून एक इन्सास रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या महिलेच्या खात्म्यानंतर दिवसभर परिसरात शोधमोहीम सुरूच ठेवण्यात आली होती.
दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाल्याची माहिती दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी दिली. ठार झालेल्या महिलेचे नाव रेणुका उर्फ बानू असे आहे. नक्षलविरोधी कारवाईसाठी या भागात सुरक्षा दल पाठवण्यात आले होते. या कारवाईदरम्यान सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू होता. दुपारच्या सुमारास चकमक पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून एक इन्सास रायफल, एका महिला माओवाद्याचा मृतदेह, दारूगोळा आणि दैनंदिन वापराच्या इतर वस्तू जप्त केल्या आहेत.
सोमवारी झालेल्या या चकमकीपूर्वी शनिवारी राज्याच्या बस्तर भागातील सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांमध्ये झालेल्या दोन चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी 18 नक्षलवाद्यांना ठार केले होते. त्यात 11 महिलांचा समावेश होता. या महिला नक्षलवाद्यांवर 25 लाख रुपयांचे बक्षीस होते. सुरक्षा दलांनी बस्तर रेंजमध्ये या वर्षी आतापर्यंत 119 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. शनिवारच्या चकमकीनंतर रविवारी छत्तीसगडमध्ये 50 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करत मुख्य प्रवाहात येण्याची तयारी दर्शवली होती. सरकारच्या नक्षलविरोधी मोहिमेला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.









