पालखी मिरवणुका : मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी : पारंपरिक वाद्यांच्या गजरात आंबील गाड्यांच्या मिरवणुका
वार्ताहर/किणये
तालुक्यात गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गुढीपाडव्याच्या सणानिमित्त गावागावातील विविध मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा, काकड आरती, भजन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर काही गावांमध्ये पालखी मिरवणूक झाल्या तर काही गावांमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात आंबील गाड्यांच्या मिरवणुका करण्यात आल्या होत्या. या सणानिमित्त गावागावातील मंदिरे भक्तांनी फुलून गेली होती.
साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा शुभ मानला जाणारा गुढीपाडव्याचा सण ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे. गावागावातील ग्रामदैवत मंदिरांमध्ये या सणानिमित्त विशेष अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच फुलांची सजावट केली होती. देवस्थान पंचकमिटी व ग्रामस्थांच्या वतीने या सणाची जय्यत तयारी करण्यात आली होती. पहाटे मंदिरांमध्ये काकड आरती करण्यात आली. त्यानंतर भजन मित्र कार्यक्रम झाले.
काही ठिकाणी पावसाचा शिडकावा
गुढीपाडवा सणाच्या पूर्वसंध्येला शनिवारी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. यामुळे बळीराजा सुखावल्याचे दिसून आले. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर रविवारी सकाळी शेतकऱ्यांनी आपापल्या शेत शिवारात जाऊन पूजा केली. बहुतांशी शिवारात या शुभमुहूर्तावर नांगरण केली. तसेच विविध पिकांची पूजा बळीराजांनी केली. बैलांना सजवून काही गावांमध्ये आंबील गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरांमध्ये पूजा करताना आंब्याच्या झाडाची आंबोती कडुनिंबाची पाने, आंबा, विविध फळे व पुरणपोळी तसेच गोड नैवेद्य दाखवण्यात आला.
खरेदीची लगबग शुभेच्छांचा संदेश
गुढीपाडव्याच्या सणानिमित्त मेसेज, व्हाट्सअप, फेसबुक आदिंसह सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देताना नागरिक दिसत होते. या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्रामीण भागातील नागरिक शहरात जाऊन विविध साहित्यांची खरेदी करताना दिसत होते. यामध्ये प्रामुख्याने सोने चांदी आदींची खरेदी करण्यात आली. तसेच दुचाकी, चारचाकी, टेम्पो, ट्रॅक्टर आदी वाहनांची खरेदी काही शेतकऱ्यांनी केली. तसेच विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करण्यात आली. पिरनवाडी, मच्छे, बेळगुंदी, हलगा, बस्तवाड या भागातील छोट्या बाजारपेठांमध्येही विविध खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पहावयास मिळाली.









