घरोघरी आंब्यांची तोरणे बांधून सडा, रांगोळी घालून परंपरेनुसार गुढी पूजन : मंदिरांतून दर्शनासाठी रांगा
खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात गुढीपाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी सकाळपासूनच मंदिरांतून विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तर पहाटेपासूनच घरोघरी आंब्यांची तोरणे बांधून सडा, रांगोळी घालून परंपरेनुसार गुढी उभाऊन त्याचे पूजन करण्यात आले. तर मंदिरांतून सायंकाळी दर्शनासाठी लोकांची गर्दी दिसून येत होती. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ग्रामदेवता रवळनाथ मंदिर, सातेरी माउली मंदिर, चौराशी मंदिर, लक्ष्मी मंदिर, राम मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर तसेच शहरातील इतर मंदिरात पहाटेपासूनच अभिषेक, पूजा, विधी करण्यात आल्या. तर घरोघरी महिलांनी पहाटेपासूनच दारात सडा समार्जन करून रांगोळ्या काढल्या होत्या. त्यानंतर घरोघरी गुढी उभारुन पूजन करण्यात आले. गुढीपाडव्यानिमित्त खरेदीसाठी दुकानातून मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सोने, टी.व्ही, फॅन, फ्रीज, कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
फुले आणि पुजेच्या साहित्यासाठी खरेदीसाठी व गेल्या तीन-चार दिवसापासून बाजारात गुढीपाडव्याच्या सणानिमित्त मोठी गर्दी होती. नववर्षारंभानिमित्त दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. सायंकाळी ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिर, सातेरी माउली, रवळनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत होती. तर गुढीपाडव्यानिमित्त रवळनाथ मंदिरात देवाला चांदीच्या मूर्तीचे पूजन करण्यात येते. पाडव्यानिमित्त दुपारी 3 वाजता ग्रामजोशी सिताकांत जोशी यांनी पंचांगाचे पूजन करून वाचन केले. आणि पुढील वर्षाच्या भविष्याचा आणि पर्जन्यमानाचा आढावा सादर केला. तालुक्याच्या ग्रामीण भागातही गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरात अभिषेक, पूजा, अर्चा धार्मिक सोहळे झाले. नाट्याप्रयोगही झाले. एकूणच खानापूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे पालखीचे आयोजन,आज महाप्रसाद
शहरातील स्वामी समर्थ केंद्रात गुढी पाडव्यानिमित्त विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी दुपारी 4 वाजता केंद्रातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. त्यांनतर शहरातील मठ गल्ली, घोडे गल्ली, निंगापूर गल्ली, शिवस्मारक, स्टेशन रोड, चिरमुरकर गल्ली, केंचापूर गल्ली, चौराशी देवी मंदिर, घाडी, गुरव गल्ली, बेंद्रे चौक, विठोबा देव गल्ली, अर्बन बँक चौक यासह विविध मार्गावरुन ही पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत समर्थ केंद्राचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोमवार दि. 31 रोजी श्री स्वामी जयंतीनिमित्त स्वामी समर्थ केंद्रात विशेष पूजेचे आयोजन केले असून सकाळी 8 वाजता श्री स्वामी याग करण्यात येईल. दुपारी 12.30 नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.









