सामनावीर नितीश राणाची 36 चेंडूत 81 धावांची खेळी : चेन्नई अवघ्या 6 धावांनी पराभूत : हसरंगाचे 4 बळी
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
रियान परागच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या 6 धावांनी पराभव केला. राजस्थान रॉयल्सने सीएसकेला 183 धावांचे लक्ष्य दिले. पण चेन्नईचा संघ निर्धारित 20 षटकांत 6 विकेट गमावत 176 धावा करूच शकला. जडेजा आणि धोनी दोघेही मैदानावर होते, पण धोनी बाद झाला त्यानंतर जडेजा शेवटपर्यंत मैदानात कायम होता, पण यावेळेस मात्र तो संघाला विजय मिळवू देऊ शकला नाही. राजस्थानचा हा पहिला विजय ठरला तर चेन्नईला मात्र सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
राजस्थानच्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सलामीवीर रचिन रवींद्रला शून्यावर गमावले, तर राहुल त्रिपाठी 23 धावा करून बाद झाला. त्यानंतर सर्वांच्या नजरा या कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या फलंदाजीवर होत्या. ऋतराजने अर्धशतक झळकावत संघाचे आव्हान जिवंत ठेवले होते. ऋतुराजने 7 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 63 धावांची खेळी साकारली खरी, पण त्याला अखेरपर्यंत फलंदाजी करता आली नाही. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजावर विजयाची भिस्त होती. धोनीने 11 चेंडूत 16 धावा केल्या पण तो संदीप शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर जडेजाने 22 चेंडूत नाबाद 32 धावांची खेळी केली पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईला 6 बाद 176 धावापर्यंत मजल मारता आली. राजस्थानकडून वानिंदू हसरंगाने सर्वाधिक 4 गडी बाद केले.
नितीश राणाची धमाकेदार खेळी
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. यशस्वी जैस्वालला 4 धावा काढल्यानंतर खलील अहमदने आऊट केले. यानंतर, संजू सॅमसनने नितीश राणासोबत मिळून राजस्थानचा डाव सांभाळला, पण संजू मोठी खेळी खेळू शकला नाही आणि 16 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. त्याला नूर अहमदने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, नितीश राणा शानदार खेळी खेळून आऊट झाला. त्याला रविचंद्रन अश्विनने आऊट केले. नितीश राणाने 36 चेंडूत 81 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 5 षटकार मारले. कर्णधार रियान परागने 37 धावांची खेळी साकारली. वानिंदू हसरंगा (4) आणि ध्रुव जुरेल (3) हे काही खास कामगिरी करू शकले नाही. शिमरॉन हेटमायरने 16 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले. यामुळे राजस्थानने 9 गडी गमावत 182 धावा केल्या. चेन्नईकडून खलील अहमद, नूर अहमद व तिक्षणा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान 20 षटकांत 9 बाद 182 (संजू सॅमसन 20, नितीश राणा 81, रियान पराग 37, खलील अहमद, नूर अहमद, थीक्षाना प्रत्येकी दोन बळी)
चेन्नई 20 षटकांत 6 बाद 176 (राहुल त्रिपाठी 23, ऋतुराज गायकवाड 63, जडेजा नाबाद 32, धोनी 16, हसरंगा 4 बळी)









