टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर : 5 टी-20 व 3 वनडे सामने खेळणार : वेळापत्रकाची घोषणा
वृत्तसंस्था/ मुंबई, सिडनी
सध्या सगळीकडे आयपीएल 2025 च्या सामन्यांची चर्चा सुरु आहे. यादरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी (30 मार्च) आपले देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय वेळापत्रक जाहीर केले. टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान 21 दिवसांत एकूण 8 सामने खेळणार आहे. वनडे मालिकेत 3 सामने तर टी-20 मालिकेत 5 सामने खेळवले जातील. विशेष म्हणजे, पुरुष संघाच्या दौऱ्यानंतर भारतीय महिला संघही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर टी 20 सामन्यावर फोकस केला आहे. यामुळे दक्षिण आफ्रिका, भारत, न्यूझीलंड व पाकिस्तानविरुद्ध मालिकेत टी 20 सामन्यांवर लक्ष केंद्रित करताना दिसणार आहेत. यातच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी टीम इंडियाविरुद्ध वनडे व टी 20 मालिकेची घोषणा केली आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून तो 8 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. व्हाईट बॉल मालिकेतील आठ सामने ऑस्ट्रेलियातील 8 शहरांमध्ये खेळवले जातील. वनडे मालिकेतील तिन्ही सामने पर्थ, अॅडलेड आणि सिडनी येथे होतील. तर टी 20 मालिकेचे सामने कॅनबेरा, मेलबर्न, होबार्ट, गोल्ड कोस्ट आणि ब्रिस्बेन येथे होणार आहेत.
कांगारुंचे व्यस्त वेळापत्रक
भारतीय संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. त्यानंतर ते इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिका खेळतील. तसेच टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी दक्षिण आफ्रिकन संघ ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. यानंतर नव्या वर्षात ते न्यूझीलंड व पाकिस्तान दौरा करणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (3 वनडे व 5 टी 20)
19 ऑक्टोबर : पहिली वनडे, पर्थ
23 ऑक्टोबर : दुसरी वनडे, अॅडलेड
25 ऑक्टोबर : तिसरी वनडे, सिडनी
29 ऑक्टोबर : पहिला टी 20 सामना, कॅनबेरा
31 ऑक्टोबर : दुसरी टी 20 सामना, मेलबर्न
2 नोव्हेंबर : तिसरा टी 20 सामना, होबार्ट
6 नोव्हेंबर : चौथा टी 20 सामना, गोल्ड कोस्ट
8 नोव्हेंबर : पाचवा टी 20 सामना, गाबा
भारतीय महिला संघही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार
भारतीय महिला संघ पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये 15 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी रोजी टी-20 सामने खेळले जातील. यानंतर उभय संघात तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु होईल. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील आठ वेगवेगळ्या ठिकाणी आठ सामने खेळवले जाणार आहेत.









