मियामी गार्डन्स (फ्लोरिडा)
रविवारी येथे झालेल्या मियामी खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेलारुसची टॉप सिडेड टेनिसपटू आर्यना साबालेंकाने महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविताना अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचे आव्हान सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणले.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात साबालेंकाने पेगुलाचा 7-5, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पडशा पाडला. साबालेंकाचे या स्पर्धेतील हे पहिले जेतेपद आहे. 2024 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत साबालेंका आणि पेगुला यांच्यात जेतेपदासाठी लढत झाली होती. साबालेंकाने या जेतेपदाबरोबरच 1.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली. साबालेंकाने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत तीन ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत साबालेंकाने पेगुलाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले होते. 26 वर्षी साबालेंकाने 2025 च्या टेनिस हंगामात आतापर्यंत 6 पैकी 4 स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली. यापूर्वी साबालेंकाने ब्रिस्बेनमधील टेनिस स्पर्धा जिंकली होती. तर गेल्या जानेवारीत साबालेंकाने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
मियामी टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीतील अंतिम सामना मार्सेलो अॅरव्हेलो आणि मॅटी पेव्हीक यांनी जिंकताना ज्युलियन कॅश व लॉईड ग्लासपुल यांचा 7-6, 6-3 असा पराभव करत जेतेपद पटकाविले. या सामन्यावेळी पावसाचा अडथळा आल्याने कांहीवेळ खेळ थांबवावा लागला त्यामुळे महिला एकेरीचा अंतिम सामना तासभर उशिरा सुरू करण्यात आला.









