कुल्लू येथे रस्त्यावरील वाहनांवर दगडांसह झाड कोसळले : अनेक जण जखमी
वृत्तसंस्था/ शिमला/कुल्लू
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात रविवारी भूस्खलनाची दुर्घटना घडली. रविवारी संध्याकाळी जिल्ह्यातील मणिकर्ण येथील गुरुद्वाराजवळ भूस्खलन होऊन एक मोठे झाड रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर कोसळले. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. ही घटना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रसंगी गुरुद्वारासमोर रस्त्याच्या कडेला बरेच लोक बसले होते. झाड कोसळल्यानंतर बचाव पथकांना पीडितांना बाहेर काढण्यात अडचणी आल्या. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
सायंकाळच्या सुमारास डोंगरावरील ढिगाऱ्यासह एक मोठे झाड अचानक रस्त्यावर कोसळले. याचा फटका रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक वाहनांना बसला. मृतांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेला फेरीवाला, सुमो गाडीतून प्रवास करणारे दोन लोक आणि तीन पर्यटकांचा समावेश आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचे कुल्लूचे अतिरिक्त जिल्हाधिकारी (एडीएम) अश्वनी कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच जखमींना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती हाताळत आहेत.
कुल्लू ते मणिकर्णला जोडणारा रस्ता बंद
डोंगरावरून दरड कोसळल्यामुळे कुल्लू ते मणिकर्णला जोडणारा रस्ता बंद झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मणिकर्ण येथून वाहतूक वळवली आहे. मणिकर्णसारख्या वर्दळीच्या आणि धार्मिक स्थळी ही दुर्घटना घडल्याने स्थानिक लोक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचे आणि घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. भूस्खलनामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.









