पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान नक्षल आघाडीवर मोठे यश
वृत्तसंस्था/ बिजापूर
छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये रविवारी एकत्रितपणे 50 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. या नक्षलवाद्यांपैकी 14 नक्षलींवर एकूण 68 लाख रुपयांचे बक्षीस होते. एकूण 50 नक्षलवाद्यांनी बिजापूर पोलीस आणि सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर शस्त्रs आत्मसमर्पण केली आहेत. नक्षलवाद सोडून मुख्य प्रवाहात आलेल्या या सर्वांना आता सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत मदत दिली जाणार आहे.
नक्षलवाद्यांच्या पोकळ विचारसरणीने त्रस्त होऊन एकूण 50 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. माओवाद्यांच्या पोकळ व अमानवी विचारसरणीला कंटाळून आणि शोषणामुळे त्रासलेल्या नक्षलवाद्यांनी रक्तपात आणि हिंसाचाराचा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला, असे बिजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आत्मसमर्पण करणाऱ्या 50 नक्षलवाद्यांपैकी 6 जणांवर प्रत्येकी 8 लाख रुपयांचे बक्षीस होते. तर तीन नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस होते. त्याव्यतिरिक्त पाच नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणात जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), बस्तर फायटर्स, स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ), सीआरपीएफ आणि त्यांची विशेष युनिट कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.









