पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाम काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार गौरव गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात गोगोई यांनी आसाम पोलिसांवर स्वत:च्या शक्तीचा गैरवापर करण्याचा आरोप केला आहे. सराकरी बँकेत कथित वित्तीय अनियमितांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या लोकांचे वृत्तांकन करण्याच्या आरोपात एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. या कारवाईच्या विरोधात तपास करविण्याची मागणी गोगोई यांनी पत्राद्वारे केली आहे.
आसाम को-ऑपरेटिव्ह एपेक्स ब्ँकेतील कथित घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या बँकेत मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा संचालक असून भाजप आमदार विश्वजीत फुकन हे बँकेचे अध्यक्ष आहेत. या बँकेतील कथित घोटाळ्याच्या विरोधात होत असलेल्या निदर्शनांचे वृत्तांकन करणारे पत्रकार दिलावर हुसैन मजूमदार यांना गुवाहाटी पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. यानंतर त्यांना जामीन मिळाला असता गुरुवरी पुन्हा पोलिसांनी अटक केली. पत्रकाराच्या विरोधात बँक कर्मचारी आणि व्यवस्थापकीय संचालकाने तक्रार नोदविली आहे. एक तक्रार बँक कर्मचाऱ्याच्या विरोधात जातीसूचक शब्दांच्या वापराची असून दुसरी तक्रार बँकेचे महत्त्वाचे दस्तऐवज चोरल्यासंबंधी आहे.
पत्रकार हुसैन यांना दोन्ही प्रकरणांमध्ये जामीन मिळाला आहे. आसाम पोलिसांनी याप्रकरणी अधिकारांचा मनमानी अन गैरवापर केला आहे. याप्रकरणी तपास करत जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षा करण्यात यावी. तसेच प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य सुरक्षित केले जावे. हे प्रकरण लोकशाहीवरील हल्ल्याचे आहे. वित्तीय संस्थांमध्ये पारदर्शकतेच्या घटनात्मक अधिकाराची देखील सुरक्षा केली जावी असे गोगोई यांनी पत्रात म्हटले आहे.









