वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत एक छेटे प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या विमानातून प्रवास करत असलेल्या कमीतकमी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेचा तपास सध्या प्रांरभिक टप्प्यात असल्याने बळींची संख्या वाढू शकते. हे विमान आयोवा येथून मिनेसोटाच्या दिशेने जात असताना मिनियापोलिसमध्ये एका घरावर कोसळले. यानंतर विमान आणि घराला भीषण आग लागली. घरात राहणाऱ्यांना कुठलीच ईजा झालेली नाही, परंतु घर पूर्णपणे जळाले आहे. नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड आणि स्थानिक प्रशासन या दुर्घटनेचा तपास करत असल्याची माहिती ब्रुकलिन पार्कच्या प्रवक्त्या रिसिकट अडेसोगुन यांनी दिली.
दुर्घटनाग्रस्त विमान सिंगल-इंजिन असलेले सोकाटा टीबीएम7 प्रकारचे होते. या विमानातून किती जण प्रवास करत होते हे अद्याप स्पष्ट नाही. हे विमान डेस मोइनेस विमानतळावरून अनोका काउंटी-ब्लेन विमानतळाच्या दिशेने जात असताना दुर्घटनाग्रस्त झाले आहे.
दुर्घटनेचे व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर प्रसारित झाले आहे. यात विमान एका घराला धडकताना दिसून येते. या घराला लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले आहे. आमची टीम ब्रुकलिन पार्कमध्ये घटनास्थळी उपस्थित स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून स्थितीवर बारकाईने नजर ठेवून असल्याचे मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वाल्ट्ज यांनी सांगितले आहे.









