45 देशांचा केला प्रवास
लोक आता भविष्याची चिंता न करता कुठल्याही बंधनात अडकून राहत नसल्याचे चित्र जगभरात दिसून येत आहे. अनेक लोक तर आता सर्वकाही सोडून जगभ्रमंती करत आहेत. अमेरिकेतील एका दांपत्याने देखील हेच केले आहे. या दांपत्याला जगभ्रमणाचा छंद होता, हा छंद पूर्ण करण्यासाठी या दांपत्याने नोकरी सोडून देत जहाजालाच स्वत:चे घर केले आणि त्याच्या मदतीने 45 देशांची सैर केली आहे.
33 वर्षीय मोनिका ब्रजोस्का आणि 37 वर्षीय जॉरेल कॉनली हे शालेय शिक्षक होते. दोघांची भेट 2015 मध्ये मेमफिस शहरात झाली होती. मोनिका शिकागोची रहिवासी होती. दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले. 2016 मध्ये दोघेही मेक्सिको, बेलीज आणि ग्रँड केमानच्या यात्रेवर क्रूजद्वारे गेले होते. 1 आठवड्याच्या या ट्रिपमध्ये त्यांना अत्यंत चांगले वाटल्याने त्यांनी पुढील 4 वर्षांमध्ये 9 क्रूज यात्रा केल्या. यात पोर्टो रीको, पनामा कॅनाल, कोस्टा रीका इत्यादी ठिकाणं सामील होती.
जुलै 2020 मध्ये दोघांचा विवाह झाला. महामारीच्या त्या काळात त्यांच्या प्रवासाला ब्रेक लागला. मग मार्च 2023 पासून त्यांनी पुन्हा स्वत:चा प्रवास सुरू केला. त्यांना हा अनुभव चांगला वाटल्याने त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही नोकरी सोडली, घर भाड्याने दिले आणि 8.72 लाख रुपयांची बचत वापरून 8 महिन्यांसाठी क्रूजचे बुकिंग केले. मार्च 2023 मध्ये मियामीमध्ये त्यांनी क्रूजचा प्रवास सुरू केला, तेव्हा त्यांच्याकडे नोकरी नव्हती, सामग्री विकली होती आणि घर भाड्याने दिले होते. परंतु त्यांना कुठल्याच गोष्टीचा पश्चाताप नव्हता.
दोघेही अत्यंत तणावमुक्त जीवन जगत होते. 2023-24 पर्यंत त्यांनी एका मागोमाग एक 36 क्रूज यात्रा केल्या आहेत. मोनिकाच्या आईवडिलांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना त्यांची आठवण येते, परंतु कुठल्याही आपत्कालीन स्थितीत आपण त्यांच्याकडे पोहोचू शकते हे मोनिका जाणून आहे. मोनिका सोशलमीडियावर स्वत:च्या प्रवासाशी निगडित छायाचित्रे आणि व्हिडिओज पोस्ट करत असते.









