देशाची अर्थव्यवस्था मंदावलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर येत्या आठवड्यात-एप्रिल दोन नंतर-एक नवे आव्हान उभे ठाकणार आहे. त्या तगड्या आव्हानाला ज्या पद्धतीने भाजप आणि तिचे सरकार तोंड देईल त्यावर पुढील राजकारण देखील अवलंबून राहणार आहे. हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीतील विजयानंतर मोदी आणि त्यांचा पक्ष हा उत्तुंग शिखरावर आहे. त्यांच्या जवळपास येऊ शकेल अथवा जवळ येण्याची कल्पना देखील कोणी करू शकेल असा कोणताही माईचा लाल समोर दिसत नाही आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत ‘मोदी हैं तो मुमकिन है’ चे जे नारे ऐकू येत होते. तद्वतच स्थिती आहे.
केंद्रात भाजपला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळालेले नसले तरी एकीकडे नितीश कुमार आणि दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांना निष्प्रभ करण्यात भाजपला यश मिळालेले आहे. राष्ट्रीय प्रश्नांवर फारसा आवाज न काढता त्यांनी मोदींचे महिमा मंडन सुरु ठेवलेले आहे. इंडिया आघाडीतील भांडणांनी विरोधकांचे किती नुकसान होत आहे अथवा कसे? हा प्रश्न अलाहिदा. पण त्याने भाजपमध्ये एक ‘फील गुड’ फिलिंग दिसून येत आहे. अगोदरच आजारी असलेले नितीश कुमार यांची तब्येत जर अजून बिघडली आणि ते फारच विचित्र वागू लागले तरच यावर्षअखेर होत असलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला धोका संभवतो अन्यथा नाही असे सध्यातरी दिसत आहे. नितीश यांच्या तब्येतीविषयी सत्ताधारी संयुक्त जनता दल तसेच भाजपमध्ये चिंता आहे. नुकतेच एका समारंभानंतर राष्ट्रगीत सुरु असतानाच नितीशनी एका अधिकाऱ्याचा अचानक हात पकडून बांका प्रसंग ओढवलेला होता.
तात्पर्य काय तर राजकीयदृष्ट्या कोणतेच आव्हान दूर दूर पर्यंत मोदींच्या समोर दिसून येत नाही आहे. असे आव्हान न दिसणे हेच कधीकधी फसवे ठरू शकते. कारण अशावेळी जो कोणी सत्ताधीश असतो तो क्षणभर का होईना बेसावध होतो आणि तिथूनच गोची व्हायला सुरुवात होते. येत्या महिन्यात अहमदाबादमध्ये अधिवेशन करणार असलेल्या काँग्रेसला सूर सापडत आहे का हे कळणार आहे. पण त्या पक्षाची एव्हढी पडझड झालेली आहे की त्याला हॉस्पिटलमधील अति दक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये यायला देखील वेळ लागेल. त्याची एवढ्यात दखल घेण्याची वेळ आलेली नाही. राहुल गांधी हे चांगले मुद्दे हाती घेत असले तरी त्यांची मांडणी प्रभावी ठरत नाही आणि ते एक इम्पल्सिव्ह नेता (परिणामांचा विचार न करता मनात येईल तसे अचानक वागणारा) आहेत अशी होणारी भावना त्यांच्याकरता तसेच काँग्रेसकरता चांगली नाही. ‘वेडात दौडले वीर मराठे सात’ असे वागून चालत नसते. जेव्हा मोदी आणि अमित शहा यांच्यासारखे तुमचे विरोधक असतील तर अजिबातच नाही.
अशा वेळी शनी-मंगळा प्रमाणे अमेरिका भारताच्या कुंडलीत येऊन त्याला सतावणार काय? हा लाखमोलाचा प्रश्न पुढे आला आहे. वाढीव व्यापार कराची धमकी अमेरिकेकडून भारताला दिली जात असल्याने व त्याची अंमलबजावणी एप्रिल दोनला करण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले असल्याने सरकार हवालदिल झाले नसते तरच नवल होते. देशातील उद्योगांनी सरकारच्या संरक्षणाशिवाय जगायला शिकले पाहिजे असे अजब विधान करून व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी येणाऱ्या वादळाबाबत भारतीय उद्योगधंद्यांना सावध केलेले आहे. ‘आत्मनिर्भर भारताची’ घोषणा देशाला स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने असली तरी प्रत्यक्षात त्याने मोठ्या औद्योगिक घराण्यांनाच फायदा झालेला आहे.
अंबानी, अदानी, टाटा, कुमार मंगलम बिर्ला, सुनील मित्तल हे अब्जाधीश उद्योजक मोदी पंतप्रधान झाल्यापासून अजून गब्बर झाले आहेत, होत आहेत. जेव्हा असे मूठभर उद्योजकच मोठे होतात तेव्हा मत्तेदारी तयार होते आणि इतर उद्योगधंदे मार खातात आणि ग्राहकाला देखील त्यांच्यावर अवलंबुन राहण्याशिवाय उपाय राहात नाही, मत्तेदारी कोणतीही वाईटच. ट्रम्प यांनी लादलेल्या नव्या व्यापार कराने जपान आणि दक्षिण कोरियामधील मोटर बनवणाऱ्या कंपन्या अडचणीत आलेल्या आहेत. अमेरिकेला खूष करण्यासाठी एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक या कंपनीला भारतात उपग्रहाद्वारे ग्रामीण आणि दुर्गम भागात ब्रॉडबँड उपलब्ध करवण्याची केवळ परवानगीच सरकारने दिलेली नाही तर जिओ आणि एअरटेल या कंपन्यांबरोबर त्याच्या भागीदारीलादेखील उत्तेजन दिलेले आहे. कालपरवापर्यंत मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रीक कार बनवणाऱ्या कंपनीला भारतात येण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागले होते. आता मस्क हे ट्रम्प यांचे उजवे हात बनल्याने टेस्ला लवकरच भारतात येणार हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही.
ट्रम्प यांनी आपल्या तऱ्हेवाईकपणाने जग हादरून सोडलेले असताना भारताच्या बाजूने एक वेगळीच घटना घडत आहे. गल्वान खोऱ्यात 2020 साली झालेल्या भयानक चकमकीने चीनबरोबर भारताचे संबंध बिघडले होते पण आता नवीन परिस्थितीत दोन्ही देशात आर्थिक पातळीवर चांगल्या घटना घडत आहेत. चीनने बळकावलेली आपली जमिनीचा एक इंचदेखील परत केलेला नाही हे सत्य आहे पण सध्या सीमेवर शांतता नांदत आहे. अमेरिका बागुलबुवा झाल्याने चीन भारताशी संबंध सुधारत आहे तर भारताला चीनकडून वाढीव गुंतवणूक मिळाल्याशिवाय सत नाही आणि गत नाही. यावर्षीच्या संसदेत सादर केलेल्या आर्थिक अहवालात सरकारने चीनकडून वाढीव गुंतवणुकीचा जोरदार पुरस्कार केलेला होता. चीन ही जगाची फॅक्टरी बनल्याने भारताच्या निर्यातीच्या दसपटीने त्याच्याकडून भारताला आयात करावी लागत आहे. गेल्या पंधरा वर्षात चीनची अर्थव्यवस्था भारताच्या पाचपटीने मोठी झालेली आहे.
संसदेच्या सद्य अधिवेशनातदेखील अमेरिकेच्या भावी निर्बंधांचे पडसाद उमटले. ‘सरकार मूग गिळून का बसलेले आहे? त्याचे काही धोरण आहे की नाही? असेल तर ते विरोधकांना विश्वासात का घेत नाहीत? विरोधकांशी सल्लामसलत का करत नाहीत?’. असे विविध प्रश्न माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचेसह बऱ्याच नेत्यांनी सरकारला विचारले. देशाचा अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम करणारा हा विषय असूनही त्याबाबत लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा झालेली नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पालुपद असे की लघु आणि अति-लघु उद्योगांना मदत करण्यासाठी कस्टम्स ड्युटी कमी केली जात आहे. ‘अमेरिकेने कोणते नवे निर्बंध भारतावर लावणार हे स्पष्ट केले नसल्याने त्याअगोदर काही बोलणे निरर्थक आहे’ असा युक्तिवाद भाजपचे नेते करत आहेत.
भारतातील मंदीच्या वातावरणाचा परिणाम आयआयटीमधील विद्यार्थ्यांना देखील नोकरी मिळण्यावर झालेला आहे. संसदीय समितीच्या नुकत्याच सादर केल्या गेलेल्या एका अहवालात 2021 च्या मानाने अशा प्लेसमेंट (नोकऱ्या) मिळण्यात 10 टक्के कमी आलेली आहे. भूतान आणि मालदीव सारख्या छोट्याशा शेजारी देशापेक्षा भारताचा शिक्षणावरील दरडोई खर्च कमी आहे असे देखील या समितीने म्हटले आहे. भारतावर येत असलेल्या आर्थिक सावटाचा मुकाबला करण्यासाठी रशियाबरोबर 25 वर्षे मुदतीचा मुक्त व्यापार करावा असे देखील जाणकार सांगत आहेत. युक्रेन युद्धाच्या वेळी भारत रशियाच्या मागे ठामपणे उभा राहिलेला होता. आता ट्रम्प-पुतीन यांच्या वाढत्या गुळपीठाने रशिया जास्त शक्तिशाली बनत असताना भारताने त्याचा फायदा उचलला पाहिजे असे हे जाणकार सांगत आहेत. 1971च्या भारत पाक युद्धाच्यावेळी रशिया आपल्यामागे किती ठामपणे उभा राहिला होता याची आठवण करून दिली जात आहे. चीनचा भारताबाबतचा मैत्रीचा नवीन सूर हा रशियाने त्यावर दबाव आणल्याने निघाला आहे असे देखील काहींचे मत आहे.
तात्पर्य काय तर येणारा काळ हा खूप आव्हानात्मक राहण्याची चिन्हे असल्याने ‘तू जपून टाक पाऊल जरा’ चा मंत्र देशाला जपावा लागणार आहे. भल्याभल्यांची जगात पंचाईत होत असताना भारताला आपला झेंडा बुलंद ठेवावयाचा आहे.
सुनील गाताडे








