तासगाव :
तासगाव तालुक्यातील महिलांशी मोबाईलवरून अश्लील चॅटिंग करून त्रास देणाऱ्या उत्तरप्रदेशच्या प्रियांशकुमार गुप्ता यास अटक करण्यात तासगाव पोलिसांना यश मिळाले आहे. याबाबत माहिती अशी की, मूळचा उत्तरप्रदेश कुशिंनगर येथील रहिवासी असणारा प्रियांशकुमार दिलीपकुमार गुप्ता हा तासगाव तालुक्यात फरशी बसविण्याचे काम करीत होता. यावेळी फरशी बसविणे कामाच्या दरात झालेल्या वादातून काम अर्ध्यात सोडून गुप्ता निघून गेला. दरम्यान सदर महिलेचा नंबर उपलब्ध असल्याने त्याने स्वतःच्या मोबाईलवर तीन वेगवेगळी व्हाट्सअप कार्यान्वित केली. त्यातील एका अकौंटवरून फरशी कामावरून वाद झालेल्या महिलेला अश्लीश भाषेत चॅटिंग, फोटो पाठवून मानसिक त्रास देऊन ब्लॅकमेल करीत पैश्याची मागणी केली होती. सदर महिलेने पुराव्यानिशी तक्रार दाखल केली होती. दरम्यान मोबाईल तंत्रज्ञानाचा चलाखीने वापर करून गेली वर्षभर पोलिसांना गुप्ता याने आव्हान दिले होते. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील व सायबर तंत्रज्ञानाचे सुरज जगदाळे यांनी आरोपी प्रियांशकुमार यास कराड येथून अटक केली. त्याच्यावर विनयभंग, बॅल्कमेल करून खंडणी मागितले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी दलित महासंघ मोहिते गट महिला आघाडी तालुकाध्यक्षा प्रमिला गावडे, कार्याध्यक्षा श्रुष्टी कांबळे यांचेकडून पोलीसांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.








