सांगली :
अंकली येथील कृष्णा नदी पुलाजवळ पिस्तुल बाळगून थांबलेल्या विकास अर्जुन चौगुले (३२, रा. माळवाडी, ता. पन्हाळा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून ६० हजाराचे देशी बनावटीचे पिस्तुल, दोन काडतुसे जप्त केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणकडील एक पथक बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्यांवर कारवाईसाठी कार्यरत आहे. या पथकातील उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी विनायक सुतार, सूरज थोरात, ऋतुराज होळकर यांना अंकली येथील पुलाच्या अलिकडे एक तरूण पिस्तुल घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचला. संशयास्पदरित्या थांबलेल्या तरूणास शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत विकास चौगुले असे नाव सांगितले. त्याची झडती घेतल्यानंतर कब्जात देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जीवंत काडतुसे आढळले. त्याला पथकाने सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस कर्मचारी विनायक सुतार यांनी याबाबत फिर्याद दिली.








