काळ्यायादीतील गुन्हेगारांना पोलीस आयुक्तांचा सल्ला
गुढीपाडवा व रमजानच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी पोलीस परेड मैदानावर काळ्यायादीतील गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. सणाच्या काळात आगळीक करण्याचा प्रयत्न केलात तर याद राखा, अशी तंबी पोलीस आयुक्तांनी दिली. एपीएमसी, माळमारुती, मार्केट, शहापूर, खडेबाजार, टिळकवाडी, कॅम्प, उद्यमबाग, बेळगाव ग्रामीण, मारिहाळसह शहरातील बहुतेक पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रातील 215 हून अधिक काळ्यायादीतील गुन्हेगार या परेडमध्ये सहभागी झाले होते. प्रत्येक पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षकांवर यासाठी जबाबदारी देण्यात आली होती.
पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी प्रत्येकाची भेट घेत कोणत्या प्रकरणात यापूर्वी त्यांच्यावर कारवाई झाली आहे, सध्या ते काय करीत आहेत? आदीविषयी माहिती जाणून घेतली. शेवटी काळ्यायादीतील गुन्हेगारांना समज देण्यात आली. गुन्हेगारी कारवाईत सहभागी न होता चांगले जीवन जगण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.
वागणुकीत सुधार झालेल्या गुन्हेगारांची नावे कमी करणार
यावेळी पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले, गेल्या दहा वर्षांत एकाही गुन्हेगारी कारवाईत सहभागी न झालेल्या व वागणुकीत सुधारणा झालेल्या गुन्हेगारांची नावे काळ्यायादीतून कमी करण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. टप्प्याटप्प्याने त्यांच्या एकंदर वागणुकीचा आढावा घेत नावे कमी करण्यात येणार आहेत, असे सांगितले.









