वृत्तसंस्था / मेलबोर्न
रशियात जन्मलेली महिला टेनिसपटू डेरिया कॅसेटकिना हिने डब्ल्युटीए टूरवरील टेनिस स्पर्धांमध्ये यापूर्वी रशियाचे प्रतिनिधीत्व करीत होती. पण आता ती ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली असून तिला ऑस्ट्रेलियन नागरिकत्व मिळाले असल्याने यापुढे ती टेनिस क्षेत्रात ऑस्ट्रेलियाकडून प्रतिनिधीत्व करेल.
27 वर्षीय कॅसेटकिनाने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियन शासनाकडे कायमस्वरुपी नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. ऑस्ट्रेलियन शासनाने कॅसेटकिनाचा हा अर्ज मंजूर केला आहे. 2022 च्या फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत कॅसेटकिनाने उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती तर सध्या महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत ती 12 व्या स्थानावर आहे. डब्ल्युटीए टूरवरील विविध स्पर्धांमध्ये कॅसेटकिनाने आतापर्यंत 8 वेळा एकेरीचे अजिंक्यपद मिळविले आहे. टेनिस ऑस्ट्रेलियाने कॅसेटकिनाचा कायमस्वरुपी नागरिकत्वाचा अर्ज मंजूर केला आहे. आता यापुढे कोणत्याही स्पर्धेत सहभागी होताना कॅसेटकिना ऑस्ट्रेलियाची टेनिसपटू म्हणून ओळखली जाईल.









