वृत्तसंस्था / मियामी गार्डन्स (फ्लोरीडा)
येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये सर्बियाचा माजी टॉपसिडेड नोव्हॅक जोकोविच तसेच बिगर मानांकीत जेकुब मेनसिक यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
उपांत्य लढतीत जोकोविचने बल्गेरीयाच्या डिमिट्रोव्हचा तर मेनसिकने अमेरिकेच्या तृतिय मानांकित टेलर फ्रित्झचा पराभव केला. जोकोविच आणि डिमिट्रोव्ह यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी अर्जेंटिनाचा जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू आणि कर्णधार लायोनेल मेस्सी उपस्थित होता.
जोकोविचने उपांत्य लढतीत बल्गेरीयाच्या 14 व्या मानांकित ग्रीगोर डिमिट्रोव्हचे आव्हान 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणले. 37 वर्षीय जोकोविचने ही स्पर्धा यापूर्वी सहावेळा जिंकली असून तो आता सातव्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच जोकोविच आता व्यावसायिक टेनिस क्षेत्रातील एटीपी टूरवरील स्पर्धेत 100 वे जेतेपद मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आतापर्यंत त्याने एटीपी टूरवरील 99 स्पर्धा जिंकल्या आहेत. मात्र चालु वर्षाच्या टेनिस हंगामात जोकोविच सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत दुखापतीमुळे त्याला निवृत्त व्हावे लागले होते. अर्जेटिनाचा फुटबॉलपटू मेस्सीने जोकोविचची भेट घेतली. यावेळी मेस्सीची पत्नी आणि मुले उपस्थित होते. सामना संपल्यानंतर डिमिट्रोव्हला टेनिस कोर्टवर काहीवेळ चक्कर आल्याने त्याच्यावर वैद्यकीय इलाज करण्यात आला. जोकोविचने उपांत्य फेरीतील लढतीत पहिला सेट केवळ 32 मिनिटांत जिंकला. या सेटमध्ये त्याने तीनवेळा डिमिट्रोव्हची सर्व्हिस भेदली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये डिमिट्रोव्हला केवळ तीन गेम्स जिंकता आले. जोकोविचने हा सामना 70 मिनिटांत जिंकला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात 19 वर्षीय मेनसिकने अमेरिकेच्या टेलर फ्रित्झचे आव्हान 7-6 (7-4), 4-6, 7-6 (7-4) अशा सेट्समध्ये संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत मेनसिकला मानांकनात 54 वे स्थान देण्यात आले आहे. मेनसिकने उपांत्य फेरीतील लढत अडीच तासांत जिंकली. गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेत जोकोविचने मेनसिकचा तीन सेट्समधील लढतीत पराभव केला होता.









