सुकमा येथे 11 महिलांसह 17 नक्षलवाद्यांचा खात्मा : मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त
वृत्तसंस्था/ सुकमा
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत 17 नक्षलवादी ठार झाले आहेत. मृतांमध्ये 11 महिलांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली. तसेच महत्त्वाचे म्हणजे बारा वर्षांपूर्वीच्या घटनेत समाविष्ट असलेल्या कमांडरचाही खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीनंतर इन्सास आणि एसएलआरसह मोठ्या प्रमाणात शस्त्रs जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगडमधील नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलाला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.
नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झडल्यानंतर शनिवारी दिवसभर जंगलभागात शोधमोहीम राबविण्यात आली. या चकमकीत 17 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. एका वर्षात आतापर्यंत 410 नक्षलवादी मारले गेले आहेत. सुकमा आणि दंतेवाडा जिह्यांच्या सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाचे पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी बाहेर पडले असताना सैनिकांना नक्षलवाद्यांशी सामना केला.
सुरक्षा दलाचे पथक शनिवारी सकाळी शोध मोहिमेसाठी बाहेर पडले होते. त्यानंतर नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सकाळी 8 वाजल्यापासूनच ही चकमक सुरू झाली. यादरम्यान सैनिकांनी नक्षलवाद्यांच्या सर्वोच्च कमांडरलाही घेरले. सुकमा डीआरजी आणि सीआरपीएफचे जवानही या कारवाईत सहभागी झाले होते. सुकमाचे पोलीस अधीक्षक स्वत: या कारवाईचे नेतृत्व करत होते. सुकमा जिह्यातील केरळपाल पोलीस स्टेशन परिसरात ही चकमक झाली. सुकमा चकमकीत एका वरिष्ठ नक्षलवादी नेत्याचाही खात्मा करण्यात आला. डीव्हीसीएम जगदीश चकमकीत मारला गेल्याचे वृत्त आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रs जप्त केली आहेत.
सैनिकांचा गाभा क्षेत्रात प्रवेश
सुरक्षा दलांनी गाभा क्षेत्रात प्रवेश करत कारवाई केली. ज्या भागात ही चकमक झाली तो भाग नक्षलवाद्यांसाठी सर्वात सुरक्षित मानला जातो. सायंकाळपर्यंत या भागात शोधमोहीम व चकमक सुरू होती. या चकमकीत आणखी मोठ्या संख्येने नक्षलवादी मारले जाण्याची शक्यता आहे. खात्मा करण्यात आलेल्या 17 जणांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून दिवसअखेरपर्यंत आणखी काही नक्षलीही सुरक्षा दलांच्या कारवाईत मृत झाल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
दोन डीआरजी जवान जखमी
या चकमकीत दोन डीआरजी सैनिक जखमी झाले आहेत, परंतु त्यांची प्रकृती सामान्य असून ते धोक्याबाहेर आहेत. ही चकमक नक्षलविरोधी कारवाईअंतर्गत करण्यात आली. त्यामध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. या महिन्यातील सैनिकांची ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी, सैनिकांनी विजापूर आणि कांकेरमध्ये 30 नक्षलवाद्यांना ठार मारले होते. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या डोक्यावर कोट्यावधी रुपयांचे बक्षीस होते. तसेच 25 मार्च रोजी सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार मारले होते. त्यामध्ये 25 लाख रुपयांचे बक्षीस असलेले नक्षलवादी सुधीर उर्फ सुधाकर याचाही समावेश होता.
शस्त्र बदल घडवू शकत नाहीत : अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 17 नक्षलवाद्यांच्या खात्म्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करत मोहिमेत सहभागी जवानांचे कौतुक केले. ‘हा नक्षलवादावरचा आणखी एक हल्ला आहे! सुकमा येथे झालेल्या कारवाईत आमच्या सुरक्षा यंत्रणांनी 17 नक्षलवाद्यांना ठार मारले आणि मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रs जप्त केली.’ अशी पोस्ट त्यांनी इन्स्टाग्रामवर केली आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकार 31 मार्च 2026 पूर्वी नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध आहे. शस्त्रs आणि हिंसाचार बदल घडवू शकत नाहीत, फक्त शांतता आणि विकासच बदल घडवू शकतात, असेही ते पुढे म्हणाले.









