सांगली :
शहरातील आरवाडे पार्क परिसरातील घर फोडून कपाटातील सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करुन पोबारा केलेल्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. सौरभ महादेव पवार (वय २२, रा. पहिली गल्ली, राजीवनगर, सांगली) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून ४ लाख ३९ हजारचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अफसाना इरशाद मुलाणी यांच्या आरवाडे पार्क येथील घरात चोरी झाली होती. चोरट्याने तिजोरीतील रोकड आणि सोने चांदीचे दागिने लंपास करुन पोबारा केला होता. दरम्यान संजयनगर येथील मंगळवार बाजार येथे एकजण चोरीचा ऐवज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावला होता. काही वेळाने एकजण संशयिस्पदरित्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. तसेच त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने तसेच रोकड आढळून आली. संशयिताने आरवाडे पार्कमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलीस उपनिरिक्षक कुमार पाटील, ऋतुराज होळकर, सुशील मस्के, विनायक सुतार व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.








