सांगली :
गव्हर्मेंट कॉलनी सारख्या सुशिक्षित भागातील नागरिकांना गंडा घालत ड्रेनेज कामासाठी उकरलेली लाईन तातडीने डांबरीकरण करून मुजवल्याचे दाखवणाऱ्या ठेकेदाराचे बिंग एका पावसात फुटले आहे. भर न घालता उरकलेले हे काम एका पावसात उघडे पडले. पण त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे.
प्रणित साठी किंवा कोणत्याही कामासाठी रस्ता उकरला तर काम झाल्यानंतर त्या चरी मुजवण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांवर येते. त्यासाठी महापालिकेने ठेक्यांमध्ये पुरेशी व्यवस्था देखील करून अधिकचे मुरूम खडी यांची भर घालण्यासाठी रक्कमेची तरतूद केलेली असते. मात्र बहुतांश ठेकेदार माती पुन्हा आहे तेथे टाकून चर मुजवल्याचे ढोंग करतात. प्रभाग समित्यांच्या अधिकाऱ्यांपासून बांधकामावर देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष करायचे असा सांगली महापालिकेत लिखित नियम आहे. त्याचा फटका सुशिक्षितांच्या लोकवस्तीला बसला आहे.
मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसानंतर गव्हर्मेंट कॉलनी दत्त मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील चरी अचानक खचू लागल्या. दूरपर्यंत ठीक ठिकाणी खड्डे पडून चरी भुसभुशीत झाल्याचे दिसून येऊ लागले. आता या मार्गावरून एखादी मोठे वाहन गेले तर नक्कीच ते या रस्त्यात अडकण्याची आणि पादचारी व्यक्तीचा भार चुकून जरी या चरीच्या दिशेने पडला तर त्याचा पाय चरीत खोल अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विश्रामबाग शंभर फुटी रोड परिसरात कार्यरत असणारे कार्यकर्ते नंदकुमार पाटील यांनी याबाबत महापालिकेकडे तक्रार केली आहे. ठेकेदाराने चर मुजवताना आवश्यक तेवढा खडी आणि मुरमाचा भराव केलेला नाही. त्याकडे महापालिकेच्या संबंधित व्यक्तींनीही दुर्लक्ष केले आहे. त्या सर्वांच्या संगनमतामुळे वळवाच्या तुरळक पावसात चर मुजवण्यातला भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. महापालिकेने संबंधित ठेकेदाराला अधिकची खडी आणि मुरूम यांचा भरावा घालून या चरी मुजवून देण्यासाठी भाग पाडावे आणि नागरिकांना आश्वस्त करावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे.








