मिरज :
मिरज शहरातील शनिवार पेठ, सराफ कट्टा येथे रामचंद्र व्यंकटेश कट्टी सराफ दुकानात चांदीचे पैंजण खरेदीच्या बहाण्याने पाच बुरखाधारी महिलांनी प्रवेश केला. सुमारे चार लाख किंमतीचे आठ तोळे सोन्याचे दागिने असलेला अख्खा डबाच त्यांनी चोऊन नेला. गुरूवारी भरदुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डबा गायब असल्याचे निदर्शनास येताच सराफ दुकानदाराने सीसीटीव्ही तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत बद्रीनारायण बळवंत कट्टी (वय 42, रा. ब्राम्हणपूरी, मिरज) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. ऐन सणासुदीच्या काळात बुरखाधारी ग्राहकांकडून भरदिवसा चोरी झाल्याने सराफ पेठेत खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सराफ पेठेत बद्रीनारायण कट्टी यांचे रामचंद्र व्यंकटेश कट्टी नावाने सोने–चांदी खरेदी विक्रीचे दुकान आहे. गुरूवारी दुपारी पाच बुरखाधारी महिला व एक पुरूष असे सहाजण चांदीचे पैंजण खरेदी करण्यासाठी दुकानात आले. दुकानाचा आकार लहान असल्याने या ग्राहकांमुळे गर्दी झाली. बुरखाधारी सर्वच महिला दुकानात उभ्या होत्या. एका महिलेला चांदीचे पैंजण दाखवण्यात आले. मात्र, सदर पैंजण पायात घालून दाखविण्यासाठी ग्राहकाच्या विनंतीवऊन बद्रीनारायण कट्टी हे मुख्य काऊंटरच्या बाहेर आले.
कट्टी हे संबंधीत ग्राहकाच्या पायात पैंजण घालून दाखवत असताना एक बुरखाधारी महिला मागून त्यांच्या मुख्य काऊंटरजवळ जावून बसली. सदर काऊंटरलगतच सोन्या–चांदीचे दागिने व काही रोख रक्कम ठेवलेले कपाट होते. कट्टी यांनी कपाट उघडेच ठेवले होते. याचाच गैरफायदा घेऊन संबंधीत बुरखाधारी महिलेने कट्टी यांची नजर चुकवून मुख्य काऊंटरच्या आत प्रवेश केला. काही क्षणातच कपाटातील एक डबा काढून घेऊन स्वत:च्या पिशवीत ठेवला. त्यानंतर संबंधीत महिला दुकानातून निघून गेल्या.
कट्टी आपल्या मुख्य काऊटरवर जावून बसल्यानंतर कपाटातील एक डबा गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर डब्यात 35 नग सोन्याच्या बाली व रिंगा असे आठ तोळे वजनाचे, सुमारे चार लाख किंमतीचे दागिने होते. कट्टी यांनी संपूर्ण दुकानाची तपासणी केली. मात्र, डबा कोठेच सापडला नाही. त्यांनी दुकानातील सर्व सीसीटीव्ही तपासल्या असता, ग्राहक बनून आलेल्या बुरखाधारी पाच महिलांपैकी एकीने सदर दागिने चोऊन नेल्याचे सीसीटीव्हीत चित्रण झाले होते. याबाबत कट्टी यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपास कामी सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. याबाबत अनोळखी पाच महिला व टोपी चष्मा घातलेला एक पुरूष अशा सहा संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.








