सांगली :
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रशासनाचे आता राज्यशासनाकडूनच वाभाडे काढले जात आहेत का? असा सवाल सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.महापालिकेला 36 तासात तीन आयुक्त आले. आयुक्त शुभम गुप्ता यांची विदर्भ महामंडळाकडे बदली झाल्यानंतर 12 तासात अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे पदभार देण्यात आला. हा पदभार घेवून 12 तास होण्याआधीच त्यांच्या जागी प्रभारी अतिरिक्त आयुक्त रवीकांत अडसुळ यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे 36 तासात सांगली महापालिकेला तीन आयुक्त मिळाले.
आयएएस दर्जाचे आयुक्त शुभम गुप्ता यांची राज्यशासनाने अचानक बदली केली. त्यांना विदर्भ विकास महामंडळाचे सचिव करण्यात आले. त्यांना तत्काळ हा पदभार सोडण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्या बदलीनंतर 12 तासांनी राज्यशासनाने अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे पदभार देण्याचे आदेश दिले. देशमुख यांनी तत्काळ महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करून तो मांडला. हा अर्थसंकल्प मांडून काही तासाचा अवधी झाला नाहीत, तोपर्यंत राज्यशासनाकडून त्यांचा आयुक्तपदाचा कारभार काढून घेण्यात आला. तो दुसरे अतिरिक्त आयुक्त रवीकांत अडसुळ यांच्याकडे देण्यात आला.
अडसुळ यांच्याकडेही हे पद तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडेही हा आयुक्त पदाचा कारभार किती दिवस राहणार हाही प्रश्न आहे. महापालिकेच्या आयुक्त खुर्चीचा खेळ अजून काही दिवस असाच सुरू राहणार आहे.








