पिण्याच्या पाण्यासाठी जनतेची धावाधाव
बेळगाव : उन्हाळ्याला सुरुवात होताच शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा योग्य पद्धतीने केला जात नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून टँकरच्या पाण्याला मोठी मागणी वाढली आहे. काही भागात टँकरने पाणीपुरवठा करणारे व्यावसायिक मनमानी पद्धतीने पैशांची आकारणी करत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकेच्या 58 प्रभागांपैकी बहुतांश वस्त्यांमध्ये सहा ते सात दिवसातून एकदा पिण्याचे पाणी सोडले जात आहे. सध्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी एल अँड टी कंपनीवर सोपविण्यात आली असून 24 तास पाणी पुरविण्यासाठी जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे.
हिडकल आणि राकसकोप जलाशयातून बेळगावला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पण वेगवेगळी कारणे सांगत आठ ते दहा दिवसातून एकदा पाणी सोडले जात आहे. त्यातच शहरातील काही कूपनलिका आणि विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे सांगितले जात असल्याने टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. शहरातील सदाशिवनगर, हनुमाननगर, आझमनगर, कुवेंपूनगरसह 20 हून अधिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे या भागातील रहिवासी टीव्ही सेंटर, बॉक्साईट रोड या ठिकाणच्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. एक पाण्याचा टँकर जवळपास दहाहून अधिक ठिकाणी पाणीपुरवठा करत आहे.
पाच हजार लिटर पाण्याची क्षमता असलेल्या टँकरसाठी पाचशे रुपये मोजावे लागत आहेत तर दहा हजार लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टँकरसाठी एक हजार रुपये घेतले जात आहेत. त्याचबरोबर शहर आणि उपनगरात बांधकाम सुरू असलेल्या घरांसाठी देखील पाण्याची मागणी वाढली आहे. या बांधकामांनाही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे टँकरचालकांना अच्छे दिन आले आहेत. इतकेच नव्हेतर हॉटेल्सचालकही टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. दररोज 20 हून अधिक टँकर शंभर ठिकाणी पाणीपुरवठा करताना दिसत आहे. मात्र, त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने पैसे आकारले जात असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी लवकरच सभा घेऊ
शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू नये, यासाठी एल अँड टीच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे. याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी लवकरच सभा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केली जाणार आहे.
– मनपा आयुक्त शुभा बी.









