जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण
बेळगाव : लक्ष्मीटेक येथील जलशुद्धीकरण केंद्र ते घुमटमाळ दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीला एमएलआयआरसी परिसरात सोमवारी गळती लागल्याने दक्षिण भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. एलअॅण्डटी कंपनीकडून त्याच दिवसापासून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दुरुस्तीचे काम बुधवारी दुपारी पूर्ण झाल्याने सायंकाळनंतर दक्षिण भागाचा पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे. मराठा लाईट इन्फंट्रीच्या इंजिनिअरिंग विभागाकडून युजी केबल घालण्यासाठी खोदकाम करताना मुख्य जलवाहिनीला गळती लागली होती. त्यामुळे दक्षिण भागाचा पाणीपुरवठा तीन दिवस ठप्प राहणार असल्याचे एलअॅण्डटीकडून सांगण्यात आले होते.
450 एमएम पीएसई जलवाहिनीला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. ही माहिती समजताच एलअॅण्डटीकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सोमवारपासून बुधवारी दुपारपर्यंत वडगाव, टिळकवाडी, नानावाडी, मजगाव, उद्यमबाग, राजारामनगर, जीआयटी, चिदंबरनगर, मृत्यूंजयनगर, आरसीनगर स्टेज 1, स्टेज 2 आणि परिसर, भारतनगर, शहापूर, खासबाग, जुने बेळगाव, नाझर कॅम्प, आदर्शनगर, अनगोळ, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्राrनगर, समर्थनगर, हिंदवाडी, गोकुळनगरसह दक्षिण भागातील विविध परिसरात पाणीपुरवठा ठप्प होता. बुधवारी दुपारी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत झाला.









