नगरसेवकांकडून प्रामाणिक पाठपुरावा आवश्यक : आमदार विठ्ठल हलगेकर, खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे
खानापूर : खानापूर शहरात भुयारी गटार प्रकल्प राबवणे अत्यंत गरजेचे आहे. शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाअभावी मलप्रभा नदीत जाऊन मिसळत असल्याने हेच पाणी शहराला पुरविण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने भुयारी गटार प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. शहरातील गटारींचेही योग्य नियोजन नसल्याने काहीवेळा सांडपाणी रस्त्यावरून वाहते. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. यापूर्वी भुयारी गटर आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे सर्वेक्षण झाले होते. आणि केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहरात भुयारी गटार प्रकल्प राबविण्यासाठी तत्कालीन आमदार आणि खासदारांकडून प्रयत्न झाले होते. मात्र याचा नगरसेवकांनी योग्यरितीने पाठपुरावा केला नसल्याने गेल्या वीस वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला आहे. आज खानापूर शहराची वाढलेली व्याप्ती पाहता भुयारी गटार प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. यासाठी नगरसेवकांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे गांभीर्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांतून भुयारी गटार प्रकल्प राबविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
सांडपाण्याचे व्यवस्थापन नसल्याने शहरातील सर्व घरांचे शौचालयाचे आणि इतर सांडपाणी गटारीमध्ये सोडले जाते. हे सर्व पाणी मलप्रभा नदीत मिसळत असल्याने मलप्रभा नदीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे शहरासह शहराच्या सखल भागातील नदीकाठच्या गावांना दूषित पाण्याचा प्रादुर्भाव होत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. 30 वर्षांपूर्वी खानापूर शहराची व्याप्ती कमी होती. आज खानापूर शहराला लागून विद्यानगर, शिवाजीनगर, दुर्गानगर, दादोबानगर, गुरुकुल कॉलनी, समर्थ कॉलनी, हिंदूनगर, हुडको कॉलनीसह इतर उपनगरामुळे शहराची व्याप्ती वाढली आहे. शहरास या उपनगरातील शौचालये आणि सांडपाण्याचे नियोजन केलेले नाही. या सांडपाण्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी भुयारी गटाराच्या प्रकल्पाचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मात्र या प्रश्नाकडे नगरसेवक, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तसेच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. भुयारी गटारीच्या प्रकल्पासाठी आमदार, नगरसेवकांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
मलप्रभा पात्र दूषित होण्यापासून रोखण्यासाठी शहरात भुयारी गटार योजना व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. यासाठी नगरपंचायतीकडून काही वर्षांपूर्वी प्रयत्न झाले होते. मात्र त्याचा योग्य पाठपुरावा केला गेला नसल्याने हा प्रकल्प मार्गी लागलेला नाही. 2002 साली तत्कालीन आमदार अशोक पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून भुयारी गटार योजना मंजूर करून घेतली होती. योजना राबविण्यासाठी शहरातून भुयारी गटारी घालण्याचे खासगी कंपनीकडून सर्वेक्षण करून योजनेचा आराखडाही तयार केला होता. योजनेला 6 कोटी ऊ. खर्च अपेक्षित होता. मात्र यानंतर त्या योजनेचा कुणीच पाठपुरावा न केल्यामुळे योजना मंजूर होऊ शकली नाही, त्यानंतर 2008 साली तत्कालीन आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांनी या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. त्यावेळी प्रशासनाने याची दखल घेऊन प्रकल्पाचा नव्याने आराखडा तयार करण्यासाठी नगरपंचायतीला 13 लाख ऊ. भरण्याचा आदेश बजावला. नगरपंचायतीने याची तातडीने अंमलबजावणी करून 13 लाख ऊ. राज्य शहरी भुयारी गटार तसेच पाणीपुरवठा मंडळाच्या खात्यात जमा केले. ही योजना केंद्र व राज्य शानसाच्या माध्यमातून राबविण्यात येणार होती. यासाठी भुयारी गटार आणि सांडपाणी प्रकल्प प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा सर्वेक्षण केले. यानंतर पाठपुराव्याअभावी योजना मंजुरीचे काम रखडले. वास्तविक, मलप्रभा नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी तसेच सांडपाण्यामुळे इतर गावातील आरोग्यास धोका निर्माण होऊ नये यासाठी या योजनेला तातडीने मंजुरी मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
सांडपाणी प्रकल्प राबविण्यासाठी चार एकर जागेची गरज
खानापूरच्या भुयारी गटार योजना आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी खानापूरच्या पूर्वेकडे मारुतीनगर ते कुप्पटगिरी या पट्ट्यात किमान 4 एकर जागेची गरज आहे. कुप्पटगिरी रस्त्यावरील शहरापासून शून्य लेवलला येणारी जागा खासगी मालकीच्या आहेत. यासाठी नगरसेवकांनी ही योजना पूर्ण करण्यासाठी जागेची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे. यासाठी मारुतीनगर-कुप्पटगिरी परिसरात जागा अधिग्रहण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या शासनाकडून चार ते सहा पट नुकसानभरपाई देण्यात येते. किंवा अशी जागा उपलब्ध असल्यास मालकाकडून खरेदी करून घेणे आवश्यक आहे.
यासाठी नगरसेवकांनी गांभीर्याने घेऊन जागेचा प्रश्न निकालात काढणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षापासून अधिकारावर असलेल्या नगरसेवकांनी मलप्रभा नदी प्रदूषण मुक्ततेसाठी तसेच भुयारी गटार आणि सांडपाणी प्रकल्प राबविण्यासाठी कोणताही पाठपुरावा केलेला नाही. सध्या मलप्रभेचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी भुयारी गटार आणि सांडपाणी प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी भुयारी गटारीचा एक कलमी कार्यक्रम हाती घेऊन राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मलप्रभेचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









