वार्ताहर/किणये
तालुक्यात रब्बी हंगामात जोंधळ्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. बहुतांशी शेतशिवारांमध्ये जोंधळा पेरणी केलेली आहे. सध्या या जोंधळ्यांना कणसे बऱ्यापैकी बहरून आलेली आहेत. मात्र याच कालावधीत मंगळवार व बुधवारी अवकाळी पावसामुळे जोंधळा पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यात रब्बी हंगामात मसूर, वाटाणा, हरभरा, सोयाबीन तसेच ज्वारी आदी पिके घेण्यात येतात. यामध्ये मसूर, वाटाणा व हरभरा पिकांची शेतकऱ्यांनी मळणी केली आहे. काही शेत शिवारांमध्ये जोंधळ्याची कणसे काढण्यात आलेली आहेत. जोंधळ्याला बहरून आलेली कणसे काढल्यानंतर उरलेल्या पिकाचा कडबा म्हणून जनावरांसाठी उपयोग करतात. मंगळवारी दुपारनंतर तालुक्याच्या सर्रास भागात पावसाने हजेरी लावली. बुधवारीही वळिवाचा पाऊस झाला. या पावसामुळे जोंधळ्याची कणसे काळसर रंगाची झाली आहेत. तसेच काही शिवारातील जोंधळा पीक आडवे पडले आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. हातातोंडाला आलेली जोंधळ्याची कणसे पावसामुळे खराब झाली आहेत. यामुळे उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.









