अर्जेंटिना संघ केरळमध्ये खेळणार : केरळच्या क्रीडामंत्र्यांची माहिती : 14 वर्षानंतर खेळणार मैत्रीपूर्ण सामना
वृत्तसंस्था/कोचीन, ब्युनास आयर्स
विश्वविजेता लायोनेल मेस्सी व अर्जेंटिनाचा संघ 14 वर्षानंतर पुन्हा भारतात येणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी हा संघ कोचीन येथे प्रदर्शनीय सामना खेळणार असल्याची माहिती केरळचे क्रीडामंत्री व्ही. अब्दुरहिमन यांनी दिली. मेस्सीच्या भारत दौऱ्याची निश्चिती बुधवारी झाली. देशात फुटबॉलला आणखी चालना देण्यासाठी अर्जेंटिना संघाच्या भारत दौऱ्याची आखणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अर्जेंटिना फुटबॉल असोशिएशन व एचएसबीसी भारत व सिंगापूरमधील फुटबॉलसाठी एक वर्षाचा करार केला आहे. मेस्सी याआधी विश्वकरंडक पात्रता फेरीचा सामना खेळण्यासाठी 2011 मध्ये भारतात आला होता. आता 14 वर्षांनंतर अर्जेंटिनाची टीम पुढच्या वर्षी भारतात मॅच खेळणार आहे. अर्थात, प्रत्येक फुटबॉल प्रेमीला मेस्सीची एक तरी लाईव्ह मॅच पाहण्याची इच्छा असते. अशातच आता मेस्सीच्या चाहत्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
दरम्यान, एचएसबीसी इंडियाने अर्जेंटीना फुटबॉल असोसिएशन सोबत करार केल्यानुसार ऑक्टोबर 2025 मध्ये अर्जेंटिना संघ केरळ राज्यात एक सामना खेळेल. हा सामना केरळच्या कोचीन येथे खेळला जाईल. भारतासाठी पर्यायाने केरळसाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया केरळच्या क्रीडामंत्र्यांनी दिली आहे. याशिवाय, या सामन्यासाठी सर्वतोपरी मदत देखील करणार असल्याचे त्यांनी सांगितले.









