काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक : संघर्षात पाच सुरक्षा कर्मचारी जखमी
वृत्तसंस्था/श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील कठुआ जिह्यातील घनदाट जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले. तसेच सुरक्षा दलातील 3 जवान हुतात्मा झाले. घुसखोर दहशतवाद्यांच्या गटाला घेरण्यासाठी सुरक्षा दलांनी कारवाई तीव्र केली आहे.कठुआ जिह्यातील राजबाग पोलीस ठाण्याअंतर्गत जुठाना येथील अंबा नाल येथे काही संशयित दहशतवादी आढळल्यानंतर सकाळपासून चकमक सुरू झाली. या दहशतवाद्यांच्या शोधार्थ राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या काळात दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. गुरुवारी सकाळी झालेल्या या चकमकीनंतर कठुआमध्ये संपूर्ण परिसराला घेराव घालून व्यापक शोधमोहीम राबविण्यात आली.
कठुआमधील चकमकीत पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सुरुवातीला सूत्रांकडून देण्यात आली. मात्र, गुरुवारी रात्री उशिराने तीन जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याची माहिती देण्यात आली. चकमकीत गंभीर जखमी झालेल्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याला कठुआ जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले होते. तर इतर दोघांना जम्मू जीएमसीमध्ये पाठवण्यात आले. अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. अब्नाल सुफानमध्ये दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर कठुआ रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून कठुआ जिल्ह्यातील विविध ठिकाणी संशयित दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. सदर दहशतवाद्यांकडून हल्ल्याच्या शक्यतेमुळे रेल्वेस्थानकासह गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पाच दिवसांपासून शोधमोहीम
गेल्या आठवड्यापासून कठुआमध्ये दहशतवाद्यांचे कारनामे वाढले आहे. स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनंतर सर्व संशयित दहशतवाद्यांना घेरण्यात आले होते. हे संशयित दहशतवादी सुफानमार्गे उज्ज नदीमार्गे तेथे पोहोचले. गेल्या पाच दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात दहशतवादविरोधी कारवाई सुरू आहे. गुरुवारी सकाळी राजबागच्या घाटी जुठाणा भागात सुरक्षा दलांना दहशतवादी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गोळीबार सुरू केला. रविवारी संध्याकाळी जिह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीनंतर पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा हाच गट असल्याचे मानले जात आहे.









