3×3 बास्केटबॉल…बास्केटबॉल सर्वांना माहीत असेलच, पण हे नाव कधी ऐकलंय का ?…हा त्याचाच एक रोमांचक, शहरी नि नाविन्यपूर्ण अवतार…पारंपरिक फुल-कोर्ट बास्केटबॉलचा एक सर्जनशील प्रकार म्हणूनच तो विकसित करण्यात आला. 80 च्या दशकाच्या उत्तरार्धात अमेरिकेच्या शहरी भागात या खेळाची उत्पत्ती झाली. तिथं बास्केटबॉलचा हा संक्षिप्त प्रकार बहुतेकदा मागील दारी आणि उद्यानांमध्ये खेळला जात असे…
- 3×3 बास्केटबॉलच्या वाढत्या लोकप्रियतेनंतर जागतिक बास्केटबॉल महासंघानं (फिबा) नवीन प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आणि जगभरातील त्यांच्या सदस्य संघटना नि खेळाडूंना अधिक संधी देण्यासाठी बास्केटबॉलची दुसरी आवृत्ती म्हणून तो विकसित केला. तसंच अधिकृत नियमांसह त्याचं रुपांतर एका व्यावसायिक खेळात करण्यात आलं…
- यामध्ये प्रत्येक संघ हा चार खेळाडूंचा राहत असला, तरी प्रत्यक्ष मैदानात तीनच खेळाडू उतरतात आणि हाफ-कोर्ट रचनेत एक ‘हूप’ (बास्केटबॉल रिंग) व ‘बॅकबोर्ड’ असतो. हा जगातील आघाडीचा शहरी सांघिक खेळ मानला जातो. यावरून त्याचा प्रसार किती वेगानं झालाय ते लक्षात यावं…
- या खेळाचे नियम त्याला जलद, नेत्रदीपक आणि रोमांचक बनविण्याच्या हेतूनं आखले गेलेत…सामन्यात प्रत्येकी तीन खेळाडूंच्या दोन संघांमध्ये लढत रंगत असली, तरी ते एकाच ‘हूप’वर आक्रमण आणि बचाव दोन्हीही करतात. चेंडू कोणत्या संघाकडे आहे यावर ही भूमिका अवलंबून असते…या प्रकारात वापरला जाणारा चेंडूही वेगळ्या धाटणीचा असतो…
- 5×5 बास्केटबॉलमध्ये जी ‘थ्री पॉइट लाईन’ असते ती इथं ‘टू पॉइंट लाईन’ बनते. यात रेषेच्या बाहेरून चेंडू जाळीत टाकल्यास दोन गुण आणि त्या रेषेच्या आतून टाकल्यास एक गुण मिळतो…
- 12 सेकंदांच्या ‘शॉट क्लॉक’मुळं हा खेळ आणखी वेगवान बनतो. म्हणजे चेंडू हातात आल्यानंतर 12 सेकंदांत तो जाळीत टाकण्याचा प्रयत्न करणं आवश्यक. पारंपरिक बास्केटबॉलच्या तुलनेत हा अवधी अर्ध्यानं कमी. यामुळं 3×3 बास्कटेबालच्या स्पर्धा या जगातील सर्वांत जलद सांघिक स्पर्धांपैकी एक बनल्या आहेत…
- यात एक लढत जास्तीत जास्त 10 मिनिटं खेळली जाते. 21 गुण सर्वांत आधी मिळविणारा संघ त्वरित सामना जिंकतो. जर 10 मिनिटं संपली, तरी कोणत्याही संघाला 21 गुण मिळवता आले नाहीत, तर या अवधीत जास्त गुण पदरी असलेल्या संघाला विजेता घोषित केलं जातं…
- 2007 मध्ये ‘फिबा’नं सिंगापूर येथील 2010 च्या युवा ऑलिंपिक खेळांमध्ये 3×3 बास्केटबॉलचा समावेश करावा असा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे मांडण्याचा निर्णय घेतला. त्याला मान्यता मिळून ती अखेर या क्रीडाप्रकाराची पहिली अधिकृत स्पर्धा ठरली. तेव्हापासून हा प्रकार युवा ऑलिंपिक खेळांचा भाग राहिलाय…
- 2017 साली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळानं टोकियो ऑलिंपिक खेळांत त्याचा समावेश करण्याचा निर्णय जाहीर केला. 2021 साली झालेल्या सदर ऑलिम्पिकमध्ये लॅटवियानं पुऊष गटातील, तर अमेरिकेनं महिला गटातील सुवर्णपदक जिंकलं…
– राजू प्रभू









