मिरज :
मिरज तालुक्यातील करोली एम येथे दारू विक्री बाबत पोलिसांना टीप दिल्याचा संशय घेऊन दारू विक्रेत्यांच्या दोन गटात तुफान राडा झाला. यामध्ये कोयते व तलवारी लोखंडी रॉडसह दगडांचा वापर करण्यात आला. या मारहाणी त दोन्ही गटाकडील पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. याबाबत महेश बयाजी पाटोळे व श्रीकांत बाबुराव चव्हाण यांनी मिरज ग्रामीण पोलिसात परस्परविरोधी तक्रार केली आहे. त्यानुसार सायंकाळी उशिराने पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही गटाकडील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, करोली (एम) गावात महेश बयाजी पाटोळे व श्रीकांत बाबुराव चव्हाण हे दोघेही बेकायदेशीरपणे देशी दारू व हातभट्टी विक्री करतात. मिरज ग्रामीण पोलिसांनी दारू विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करताच दोन गटात संघर्ष झाला. पोलिसांना टीप देऊन कारवाई करण्यास भाग पाडल्याचा आरोप करत दोन गट एकमेकांना भिडले.
यावेळी गैरसमजातून एकमेकांना जाब विचारत महेश बयाजी पाटोळे व श्रीकांत बाबुराव चव्हाण यांचे दोन गट एकमेकांना भिडले. वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. लोखंडी कोयते, दगड व खुरपे हातात घेऊन एकमेकांच्या शरीरावर जखमा करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या मारहाणीत तिघे जखमी झाले. याबाबत ग्रामीण पोलिसात परस्परविरोधी तक्रार देण्यात आली आहे. मारामारी प्रकरणी पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.








