कराड :
26 मार्च 2025 चा बुधवार उजाडला तो वाहतूक कोंडीने हैराण करणाराच. सहापदरीकरणा अंतर्गत नव्या उड्डाणपुलाचे काम कोयना पुलालगत संपत असून तिथे भरावपुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी कोल्हापूर ते पुणे लेनवरील दोन लेन खोदल्या असून सध्या एका लेनवरून वाहतूक सुरू आहे. भरावपुलाच्या भिंतीचे कामामुळे खोदलेला खड्डा सोमवारच्या पावसाने आणखी खचल्याने अवघ्या एका लेनवरून सुरू असलेली वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू झाली. त्यामुळे सकाळपासून वाहतूक कोंडीत वाहनधारक अक्षरश: होरपळले. एका बाजुला वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना दमछाक तर दुसरीकडे उकाड्याने हैराण झालेल्या वाहनधारक भलतेच संतप्त दिसत होते.
दरम्यान, कराड शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी दिवसभर धावपळ करत होते. मात्र वाहनांची संख्या, भरावपुलाचे सुरू असलेले काम, एकाच लेनवरून सुरू असलेली वाहतूक आणि जाधव आर्केडसमोरील गतिरोधक या सर्व त्रांगड्याने पोलिसांच्या प्रयत्नांनाही यश येताना दिसत नव्हते.
- पिलरचा उड्डाणपुल जोडणार भरावपुलास
नव्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोल्हापूर नाक्यावरील जाधव आर्केडसमोर शेवटचे पिलर असून हा पिलर आता थेट कोयनापुलाकडून आलेल्या भरावपुलास जोडला जाईल. त्यासाठी भरावपुलाचे काम सुरू आहे. सुमारे 40 मीटर उंचीची भरावपुलाची भिंत मजबूतपणे बांधण्यासाठी कोयना पूल ते जाधव आर्केड या भागात पाया भक्कमसाठी मोठे खोदकाम केले आहे. भिंतीचे काम गेल्या आठवड्यापासून वेगाने सुरू असून त्यासाठी कराड शहरात येणारा जाधव आर्केडसमोरील वळणमार्ग बंद करून तो महात्मा गांधी पुतळ्याच्या बाजुला मार्ग केला आहे. या मार्गावरून शहरात वाहने येताना हायवेच्या वाहनांचा वेग कमी असावा म्हणून जाधव आर्केडसमोर तीन गतिरोधक तयार केले आहेत. साहजिकच गतिरोधकामुळे वाहनांची वेगमर्यादा मंदावते.
- तीन लेनवरील वाहतूक अवघ्या एका लेनवरून
वाहतूक कोंडीचे मुख्य कारण म्हणजे भरावपुलाच्या भिंतीचा पाया भक्कम करण्यासाठी पुणे ते कोल्हापूर लेनवरील वाहतूक जी तीन लेनवरून सुरू होती ती आता अवघ्या एका लेनवरून सुरू आहे. अवजड वाहनांची हायवेवर संख्या जास्त असल्याने या लेनवरून फक्त एकच वाहन जाऊ शकते. इथे ओव्हरटेक करण्यास जराही जागा शिल्लक नसल्याने पाठीमागे वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहेत. परिणामी हायवेवर वाहतूक कोंडीने वाहनधारक हैराण झाले असून अर्ध्या कि. मी. साठी तास तासभर संथगतीने वाहने चालवावी लागत आहेत. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सुर्यंवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय भोईटे, राजेंद्र घाडगे, उपनिरीक्षक जगदाळे, बी. एस. कांबळे यांच्यासह पोलीस दिवसभर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना देऊन थकले होते. उन्हाच्या कडाक्यात पोलिसांचीही पुरती दमछाक झाली होती.
- हलक्या वाहनांनी जुन्या कोयना पुलाचा वापर करावा
भरावपुलाचे काम अजुनही काही दिवस चालणार असल्याने वाहतूक कोंडी नित्याची असेल. त्यामुळे सातारा बाजुकडून कराड शहरात येणाऱ्या हलक्या वाहनांनी जुन्या कोयनापुलाचा वापर करावा. ज्या हलक्या वाहनांना कोल्हापूर बाजुकडे जायचे आहे त्यांनी जुन्या कोयना पुलावरून दैत्यनिवारणी मंदिरापासून पोपटभाई पेट्रोलपंप चौक मार्गे भेदा चौकातून मार्केट यार्ड, नांदलापूर रस्त्याचा वापर करावा. अवजड वाहनांच्या अगदी जवळून वाहने पास करण्याचा धोका टाळावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे संदीप सुर्यवंशी यांनी केले.








