एलअँडटी अधिकारीही होणार सहभागी
बेळगाव : महापालिकेच्या 58 प्रभागांमधील पाणीपुरवठा व्यवस्था आणि समस्येबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवार दि. 27 रोजी दुपारी 12 वाजता महापालिकेच्या मुख्य सभागृहात एलअँडटी आणि पाणीपुरवठा महामंडळ अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर मंगेश पवार यांच्या सूचनेनुसार कौन्सिल विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीची नोटीस जारी केली आहे. बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी यापूर्वी महानगरपालिकेकडे होती. मात्र, 2021 पासून ही जबाबदारी एलअँडटी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. सध्या एकूण दहा प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा योजना सुरू आहे. दक्षिण मतदारसंघात 4 आणि उत्तर मतदारसंघात 4 अशा एकूण 8 प्रभागांमध्ये 24 तास पाणी योजना सुरू आहे.
सध्या एलअँडटी कंपनीकडून उर्वरित प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. यासाठी नवीन जलवाहिन्या घालण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. राकसकोप आणि हिडकल जलाशयातून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. राकसकोप जलाशयातून येणारे पाणी लक्ष्मीटेक येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात तर हिडकल जलाशयातून येणारे पाणी बसवणकोळ येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात आणले जाते. मात्र, मुख्य जलाशयाकडून येणारी जलवाहिनी अत्यंत जुनी असल्याने त्यांना वारंवार गळती लागत आहे. परिणामी ऐन उन्हाळ्यातच शहरवासियांना पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे.
नुकतेच एमएलआयआरसी परिसरात लक्ष्मीटेक ते घुमटमाळ दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीला दोन दिवसांपूर्वी गळती लागली असल्याने दक्षिण भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी खासगी विहिरी, बोअरवेल आणि टँकरवर अवलंबून रहावे लागले आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी महापालिकेकडून एलअँडटी आणि पाणीपुरवठा महामंडळाला सूचना करण्यात येणार आहेत. त्यामुळे महापौर मंगेश पवार यांनी गुरुवारी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी आवश्यक माहितीसह बैठकीला उपस्थित रहावे, असे महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून कळविण्यात आले आहे. बैठकीत एलअँडटी अधिकाऱ्यांना धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. कारण एलअँडटीच्या कामामुळे बेळगावकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.









