एप्रिल ते मे दरम्यान 13 फेऱ्या
बेळगाव : उन्हाळ्यातील सुट्यांमध्ये रेल्वे प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई-बेंगळूर मार्गावर विशेष रेल्वे सोडली जाणार आहे. या रेल्वेच्या एप्रिल ते जून दरम्यान एकूण 13 फेऱ्या होणार आहेत. रेल्वेला 22 डबे जोडण्यात आले आहेत. यामुळे बेळगावच्या प्रवाशांना बेंगळूर तसेच मुंबईला जाणे सोयीचे होणार आहे. बेंगळूर येथील एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलपासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपर्यंत रेल्वे धावणार आहे. रेल्वे क्रमांक 01013 ही एक्स्प्रेस मुंबई येथून रात्री 12.30 वाजता 5, 12, 19, 26 एप्रिल, 3, 10, 17, 24, 31 मे, 7, 14, 21, 28 जून रोजी निघणार आहे. दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता बेंगळूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वे क्र. 01014 ही एक्स्प्रेस बेंगळूर येथून सायंकाळी 4.40 वाजता 6, 13, 20, 27 एप्रिल, 4, 11, 18, 25 मे, 1, 8, 15, 22, 29 जून रोजी निघणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता मुंबईला पोहोचेल. या एक्स्प्रेसला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, कुडची रायबाग, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड, हुबळी, हावेरी, राणेबेन्नूर, हरिहर, दावणगेरी, बिरुर, अरसीकेरे व तुमकूर असे थांबे देण्यात आले आहेत.









