वार्ताहर/सांबरा
हलगा येथील महालक्ष्मी यात्रेची बुधवार दि. 26 रोजी उत्साहात सांगता झाली. रात्री महालक्ष्मी मंदिरात आरती होऊन यात्रेची सांगता करण्यात आली. गेले नऊ दिवस श्री महालक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झाली होती. अनेक भाविकांनी ओटी भरून देवीचे दर्शन घेतले. या यात्रेनिमित्त महालक्ष्मी यात्रोत्सव कमिटी व देवस्थान पंच कमिटीच्यावतीने श्री महालक्ष्मी मूर्तीचे कारागीर, तसेच कामगारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यात्रा सुरळीत पार पाडल्याबद्दल महालक्ष्मी यात्रोत्सव कमिटी सदस्य व देवस्थान पंच कमिटी सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिक, ग्रामपंचायत, पोलीस खाते, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी व इतर अनेकांनी सहकार्य केल्यामुळे यात्रा यशस्वी झाली आहे. यामुळे महालक्ष्मी यात्रोत्सव समिती व देवस्थान पंच समितीच्यावतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. महालक्ष्मी मंदिर येथे रात्री श्री महालक्ष्मी देवीची आरती होऊन यात्रेची उत्साहात सांगता करण्यात आली. यावेळी महालक्ष्मी यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष, सदस्य व हलगा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









