कचरा टाकणाऱ्यांना दंड ठोठावण्याचा आदेश, मनपा आयुक्तांचा शहरात पाहणी दौरा : कर्मचारी धारेवर
बेळगाव : महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी बुधवारी सकाळी शहर व उपनगरात अचानक फेरफटका मारत विविध ठिकाणी पाहणी दौरा केल्याने मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. कोट्यावधी रुपये खर्चून किल्ला तलावाचा विकास केला जात आहे. मात्र, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेल्या कचऱ्याचे ढीग पाहून मनपा आयुक्त संतापल्या. त्यामुळे त्यांनी पर्यावरण अभियंत्यासह अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांना नोटीस बजावण्याची सूचनाही केली.
शहर आणि उपनगरातील कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासह योग्यरीत्या विल्हेवाट लावली जात आहे, असा गाजावाजा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जात आहे. ओला, सुका आणि प्लास्टिक कचऱ्याच्या वर्गीकरणामुळे महापालिकेची दरमहा दहा लाख रुपयांची बचत होत असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यातच अलीकडे केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण पथकानेही बेळगाव शहराचा सर्व्हे केला आहे. मात्र, बुधवारी सकाळी महापालिका आयुक्तांनी अचानक शहरात फेरफटका मारून विविध ठिकाणी पाहणी दौरा केला. त्यावेळी आरोग्य विभागाचे मात्र पितळ उघडे पडले.
तलावाभोवती कचऱ्याचा ढीग
विविध ठिकाणी कचरा समस्या कायम असल्याचे मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आले. प्रामुख्याने मनपा आयुक्तांनी किल्ला तलाव परिसराला भेट देऊन पाहणी केली. त्या ठिकाणी विकासकामे सुरू असतानाच काही जणांनी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कचरा भरून सदर कचरा किल्ला तलावावर फेकून दिला आहे. कचऱ्याचा ढीग पाहून आयुक्तांचा पारा चढला. तलावाभोवती सहा फूट उंच संरक्षक भिंत बांधण्यात आली असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा कोणी टाकला? असा सवाल उपस्थित करत कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना नोटीस बजावण्याची सूचना आयुक्तांनी केली.
यानंतर मनपा आयुक्तांनी गणपत गल्ली, चव्हाट गल्ली, गांधीनगर, अलारवाड, कणबर्गी तलाव, बसवन कुडची, गोवावेस, खाऊकट्टा, भातकांडे स्कूल परिसराला भेट देऊन तेथील समस्यांची पाहणी केली. यावेळी कचरा उचलीसह स्वच्छता, रस्ते, गटारी, नाले आदींची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. महापालिका आयुक्तांच्या या दौऱ्यामुळे विशेष करून महापालिकेतील आरोग्य आणि पार्यवरण अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ उडाली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी, अदिल खान पठाण, प्रवीण आदी उपस्थित होते.
स्वच्छतागृहे बंदच
किल्ला तलावात सकाळ आणि संध्याकाळ दरम्यान फिरावयास येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. सदर स्वच्छतागृहे 24 तास सुरू ठेवण्याची सूचना करून देखील पाहणी दरम्यान स्वच्छतागृहे कुलूपबंद असल्याचे मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तेथील सुरक्षारक्षकाला फैलावर घेतले. स्वच्छतागृहांचे कुलूप उघडण्यास सांगून पाहणी केली. तसेच यापुढे स्वच्छतागृहे कायम सुरू ठेवण्याची सूचनाही करण्यात आली.









