ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष : पाणी रस्त्यावर आल्याने नाल्याचे स्वरूप
वार्ताहर /उचगाव
सुळगा (हिं.) या गावातील गटारींची स्वच्छता ग्राम पंचायतीने केली नसल्याने मंगळवारी अकस्मात झालेल्या मुसळधार पावसामुळे गटारी तुंबून गटारीतील पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. गटारीतील तुंबलेले हे दुर्गंधीयुक्त पाणी आणि घाण यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने ग्राम पंचायतीने तातडीने या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी गावातील व ज्या भागात पाणी साचले तेथील नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच दुर्गंधीयुक्त पाणी साचून तलावाचे स्वरूप आले होते.
ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वी गावातील गटारींची स्वच्छता करणे गरजेचे आहे. तसेच गावातून या गटारी बांधण्यात आलेले आहेत. त्या गटारींचे पाणी पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्याने व सदर पाणी शेतवडीत जात असल्याने या पाण्याचा प्रश्न मोठा आवासून उभा आहे. यावरती तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी सुळगा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन पंचायतसमोरच हे पाणी मोठ्याप्रमाणावर साचून होते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
अचानक झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने काही रहिवाशांच्या वापरत असलेल्या पाण्याच्या टाकीत जाऊन पाणी दूषित झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्याचबरोबर ड्रेनेजचे पाणीही यात मिक्स झाल्याने व अनेक गटारीतून साचलेले ड्रेनेजचे पाणी या पाण्यात मिसळल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका असल्याने ग्रामपंचायतीने याकडे तातडीने लक्ष देऊन ही समस्या लवकरात लवकर सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी नागरिकांनी विनंती केली आहे.
शेतातील पिकांचे नुकसान
सुळगे गावातील पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. अकस्मात होणारा वळीव पाऊस तसेच पावसाळ्यातील पावसाचे पाणी गटारीत जमा होऊन अखेर ते शेतवडीत जाते. त्यामुळे शेतातील पिकांना या पाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या पाण्यामुळे शेतातील पिके खराब होत असल्याने शेतकरीही चिंतेत आहेत.









